माणगाव-ताम्हिणी घाटात ५ वऱ्हाडींवर काळाचा घाला
रत्नागिरी
रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव-ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी खासगी आराम बस उलटून झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात ५ वऱ्हाडींवर काळाने झडप घातली. मृतांमध्ये ३ महिलांसह २ पुरुषांचा समावेश असून २७ जण जखमी झाले आहेत, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. शुक्रवारी सकाळी १०च्या सुमारास हा अपघात घडला.
संगीता धनंजय जाधव, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव, गौरव अशोक दराडे, गणेश इंगळे (सर्व रा. पुणे) अशी पाच मृतांची नावे आहेत. खासगी आराम बस
(एमएच १४ जीयु ३४०४) मधून पुणे येथून जाधव परिवार वऱ्हाड घेऊन लग्न सोहळ्यासाठी महाड-बिरवाडी येथे येत होते. बस ताम्हिणी घाटात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. अपघात इतका भीषण होता की, ५ वऱ्हाडींचा जागीचमृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त कळताच माणगाव आणि महाड पोलिसांसह बचाव पथक तातडीने अपघातस्थळी पोहचले. जखमींना उपचारासाठी माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्गावर धावणाऱ्या एकामागोमाग एक रुग्णवाहिकांमुळे नजीकचे रहिवासी घटनास्थळी पोहचले. बस उलटल्याने अनेक वऱ्हाडी बराच वेळ जखमी अवस्थेत बसमध्येच अडकले होते.
वराच्या आईलाही मृत्यूने कवटाळले!
अपघातग्रस्त खासगी आराम बसमधून वर स्वप्निल जाधव यांच्या मातोश्री संगीता धनंजय जाधव प्रवास करत होत्या. त्यांच्यावरही नियतीने झडप घातली. या दुर्घटनेने जाधव व उत्तेकर कुटुबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.