टिप्पर घरावर ओतल्याने वाळूखाली दबून ५ जणांचा मृत्यू
जालना पासोडीतील घटना
पाचही मृत एका कुटुंबातील
जालना
जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळुचा टिप्पर ओतल्याने वाळुखाली दबून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. २२) रोजी रात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पासोडीत अवैध वाळू वाहतुकीने या पाच जणांचा बळी गेला आहे. यामध्ये गोळेगाव येथील पिता-पुत्रांचाही समावेश आहे.
ही घटना समजताच गावकऱ्यांनी धाव घेतली. त्यामुळे या वाळुच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. इतर पाच जणांचा मात्र जागीच मृत्यू झाला आहे.
जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एक पुलाच्या बांधकामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या जवळच एक पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते. पहाटे साडेतीनचा याठिकाणी वाळुचा टिप्पर आला. टिप्पर चालकाने निष्काळजीपणाने वाळुचा टिप्पर हे कुटुंब झोपलेले त्या पत्र्याच्या शेडवर ओतला. हा प्रकार समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या लक्षात आल्यावर तिने आरडा ओरडा केला. त्यानंतर टिप्पर चालकाने ताबडतोब तेथून पळ काढला. त्या महिलेने प्रसंगावधान दाखवत आजुबाजुच्या लोकांना आणि शेतकऱ्यांना बोलावून वाळुच्या ढिगाऱ्याखालील पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी १२ वर्षीय मुलीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. मात्र इतर पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गणेश काशिनाथ धनवई (वय ५०), भूषण गणेश धनवई (वय १७) दोघेही राहणार गोळेगाव (ता. सिल्लोड), राजेंद्र दगडूबा वाघ (वय ४०) रा. दहिद, (ता. बुलढाणा), सुनील समाधान सपकाळ (वय २०) रा. पद्मावती (ता. भोकरदन), सुपडू आहेर (वय ३८) रा. तोंडापूर (ता. जामनेर) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.
ही घटना घडली असताना जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गावकऱ्यांनी पंचनामा न करता मृतांचे शव ताब्यात घेऊ नये असा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. आणि अवैध वाळुचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण केले. अशी माहिती पोलिस निरीक्षक इंगळे यांनी यावेळी दिली.