इस्रायलच्या हल्ल्यात अल जझिराचे 5 पत्रकार ठार
हमासशी संबंधित होता पत्रकार अनस : इस्रायल डिफेन्स फोर्स
वृत्तसंस्था/गाझापट्टी
अरब देशांमधील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क असलेलया अल जझिराचे 5 पत्रकार इस्रायलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत. गाझाच्या अल शिफा रुग्णालयानजीक इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हे पत्रकार मारले गेल्याचे अल जझिराकडून सांगण्यात आले. गाझामध्ये पत्रकारांसाठी उभारण्यात आलेल्या एका तंबूवर झालेल्या हल्ल्यात हे बळी गेले आहेत. इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये प्रसिद्ध पत्रकार अनस अल शरीफ आणि त्याचे चार सहकारी सामील आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात अनससोबत पत्रकार मोहम्मद करीके, कॅमेरा ऑपरेटर इब्राहिम जहीर, मोहम्मद नौफल आणि मोमेन अलीवा यांचा मृत्यू झाला आहे.
5 पत्रकारांसोबत दोन अन्य लोकांचा मृत्यूही या हल्ल्यात झाला असल्याचे सांगण्यात आले. अनस अल शरीफला लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला होता. अनस हा हमासच्या एका युनिटचा प्रमुख म्हणून काम करत होता असा दावा इस्रायल डिफेन्स फोर्सकडून करण्यात आला आहे. हल्ल्यात मारले गेलेल्या इतर पत्रकारांचा उल्लेख आयडीएफने मात्र केलेला नाही. गाझामध्ये सातत्याने वृत्तांकन करणाऱ्या निवडक पत्रकारांमध्ये 28 वर्षीय अनस यांचा समावेश होता. अनस यांनी गाझाच्या तुलनेत अवघड भागांमध्ये जात तेथील स्थिती जगाला दाखवून दिली होती, असे अल जझिराचे व्यवस्थापकीय संपादक मोहम्मद मोआवद यांनी सांगितले आहे.
गाझामध्ये 22 महिन्यांपासून संघर्ष सुरू
गाझामध्ये ऑक्टोबर 2023 पासून सातत्याने संघर्ष जारी आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने युद्ध पुकारले होते. इस्रायलने हमासचा खात्मा करण्याचा निश्चय केला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 60 हजारांहून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे.