मडगावात 5.60 कोटीचे‘व्हेल व्होमिट’ जप्त
कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई : ‘आरपीएफ’ व वन विभागाची मदत,केरळच्या दोन संशयितांना अटक
मडगाव : मडगावात कोकण रेल्वे पोलिसांनी रु. 5 कोटी 60 लाख किंमतीची ‘व्हेल व्होमिट’ (अँबर्गिस) जप्त करण्याची महत्त्वपूर्ण घटना घडली आहे. कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे निरीक्षक, आरपीएफ अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत अऊण रा. राजन (वय 30 वर्षे) आणि निबिन व्हर्गिस (वय 29 वर्षे) या दोघांना अटक करण्यात आली असून दोघेही केरळचे आहेत. मडगावातील कोकण रेल्वे पोलीस स्थानकावर रेल्वे संरक्षण दलाचे मडगाव निरीक्षक विनोद मिश्रा यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, 25 ते 30 वयोगटातील दोन पुऊष 15 रोजी सायंकाळी 3 ते 4.30 च्या दरम्यान मडगाव रेल्वे स्थानकाला भेट देणार आहेत आणि ते मडगाव रेल्वेस्थानक ते केरळपर्यंत ट्रेनने प्रवास करण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यांच्याकडे ‘व्हेल व्होमिट’ (अँबर्गिस) म्हणून ओळखला जाणारा प्रतिबंधित पदार्थ असेल, अशीही माहिती मिळाली होती.
कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे निरीक्षक, आरपीएफ अधिकारी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने दोघेही संशयित मडगाव रेल्वे स्थानकावर आले असता कारवाई केली. मिळालेल्या माहितीमधील वर्णनानुसार, त्यांच्या ताब्यातून जप्त केलेला चिकट तपकिरी रंगाचा पदार्थ हा योग्यरित्या एका खोक्यात पॅकबंद केला होता, जो व्हेलची उलटी (अँबर्गिस) असल्याचा संशय होता. वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अन्वये संबंधित तरतुदीनुसार कोकण रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील गुडलार हे जप्त केलेल्या व्हेल व्होमिटचे उगमस्थान शोधून त्याच्या व्यापारात गुंतलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कोकण रेल्वे पोलीस अधीक्षक गुऊदास गावडे आणि उपअधीक्षक गुऊदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. संशयितांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
‘अँबर्गिस’ला मोठी मागणी
‘अँबर्गिस’ हा स्पर्म व्हेलच्या पचनमार्गात तयार होणारा एक चिकट मेणासारखा पदार्थ आहे, जो व्हेल उलटी करून टाकतो. व्हेलची त्याच्या पचनमार्गातून ‘अँबर्गिस’ मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. व्हेल ही संरक्षित प्रजाती आहे आणि म्हणून त्यांच्याशी कोणत्याही बाबीचा ताबा किंवा व्यापार हा वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या तरतुदीनुसार बेकायदेशीर आहे. व्हेलच्या उलटीला बाजारात मोठी मागणी आहे. कारण ती औषधांसाठी आणि महाग परफ्युम बनवण्यासाठी वापरली जाते. ‘व्हेल व्होमिट’ची किलोग्रॅममागे किंमत 1 कोटी ऊपयांपेक्षा जास्त आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी 5694 ग्रॅम व्हेल व्होमिट जप्त केलेली असून त्याची किंमत 5 कोटी 60 लाख 94 हजार रु. इतकी आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.