उम्मीद पोर्टलवर 5.17 लाख वक्फ संपत्तींची नोंदणी
6 महिन्यांच्या कालावधीतील स्थिती : 2.16 लाख नोंदणींना मंजुरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात वक्फ संपत्तींचे व्यवस्थापन आणि डिजिटल दस्तऐवज राखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उम्मीद पोर्टलवर एकूण 5.17 लाख वक्फ संपत्तींची नोंद करण्यात आली असून यातील 2.16 लाख वक्फ संपत्तींना मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाने हा आकडा जारी केला आहे. उम्मीद पोर्टलला 6 जून 2025 रोजी केंद्रीय अल्पसंख्याक कल्याणमंत्री किरण रिजिजू यांनी सुरू केले होते. या पोर्टलवर 6 महिन्यांच्या आत वक्फ संपत्तींची नोंदणी करणे अनिवार्य होते. सरकारच्या आकडेवारीनुसार 10,869 संपत्तींच्या पडताळणीदरम्यान नोंदणी फेटाळण्यात आली आहे.
6 डिसेंबर रोजी उम्मीद पोर्टलवर वक्फ संपत्तींची नोंद करण्याची मुदत संपुष्टात आली आहे. अखेरच्या दिवसांमध्ये पोर्टलवर वक्फ संपत्ती नोंद करण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाने सांगितले आहे. उम्मीद पोर्टलवर संपत्ती नेंद करण्यासाठी सरकारने अनेक समीक्षा बैठका, प्रशिक्षण कार्यशाळा संचालित केल्या. दिल्लीत वक्फ बोर्ड आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाही संचालित करण्यात आल्या. याच्या माध्यमातून संपत्तीचा तपशील पोर्टलवर कशाप्रकारे अपलोड करावा हे सांगण्यात आले. एक हेल्पलाइन क्रमांक आणि तांत्रिक सहाय्य टीमही उपलब्ध करण्यात आली.
उत्तरप्रदेशात सर्वाधिक नोंदणी
आकडेवारीनुसार सर्वाधिक वक्फ संपत्ती उत्तरप्रदेशात नोंद झाल्या असून तेथे हा आकडा 92,830 राहिला अहे. यातील 86,345 संपत्ती सुन्नी समुदायाकडून नोंद करण्यात आल्या तर 6,485 संपत्ती शिया समुदायाने नोंद केल्या आहेत. उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्रात 62,939 तर कर्नाटकात 58,328 आणि पश्चिम बंगालात 23,086 वक्फ संपत्तींची नोंदणी उम्मीद पोर्टलवर करविण्यात आली आहे.
कालमर्यादा वाढविण्यास नकार
केंद्रीय अल्पसंख्याक कल्याणमंत्री रिजिजू यांनी यापूर्वी उम्मीद पोर्टलवर वक्फ संपत्तींची नोंदणी करण्यासाठीची कालमर्यादा वाढविण्यास नकार दिला आहे. परंतु नोंदणीची प्रक्रिया सुरू केलेल्या पण काही कारणास्तव पूर्ण न करू शकलेल्या लोकांना तीन महिन्यांचा दिलासा मिळाला आहे. लाखो संपत्तींच्या नोंदणीत विलंब होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने देशभरातील वक्फ संपत्तींचा डिजिटल दस्तऐवज तयार करण्यासाठी 6 जून रोजी युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, एफिशिएन्सी अँड डेव्हलपमेंट (उम्मीद) अॅक्ट नावाने केंद्रीय पोर्टल सुरू केले होते. पोर्टलच्या नियमांनुसार देशभरातील सर्व वक्फ संपत्तींची माहिती 6 महिन्यांच्या आत पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य होते. नोंदणीसाठी 6 महिन्यांची मुदत 6 डिसेंबर रोजी समाप्त झाली आहे.