For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली कॅपिटल्सचा सलग चौथा विजय

06:58 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली कॅपिटल्सचा सलग चौथा विजय
Advertisement

मुंबईवर 29 धावांनी मात, जेमिमा सामनावीर, लॅनिंगचे अर्धशतक, जोनासनचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महिला प्रिमियर लीगमध्ये कर्णधार मेग लॅनिंग व सामनावीर जेमिमा रॉड्रिग्स यांनी नोंदवलेली जलद अर्धशतके आणि जेस जोनासन व कॅप यांच्या भेदक माऱ्याच्या बळावर दिल्ली कॅपिटल्याने मुंबई इंडियन्स महिला संघाचा 29 धावांनी पराभव केला. गुणतक्त्यातील अग्रस्थानही त्यांनी राखले.

Advertisement

मुंबई इंडियन्सकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर सलामीवीर लॅनिंगने 38 चेंडूत 53 धावा फटकावल्या तर जेमिमाने जोरदार फटकेबाजी करीत केवळ 33 चेंडूत 69 धावा झोडपल्या. जेमिमाच्या या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत 4 बाद 192 धावांचा डोंगर उभारता आला. मुंबई इंडियन्स महिलांना हे आव्हान पेलवले नाही. पहिल्या षटकापासूनच्या त्यांच्या पडझडीला सुरुवात झाली, ती अखेरपर्यंत थांबली नाही. अमनजोत कौर व सजीवन सजना यांनी सहाव्या गड्यासाठी 48 धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबईला 20 षटकांत 8 बाद 163 धावांपर्यंतच मजल मारता आली. अमनजोतने 27 चेंडूत 7 चौकारांसह 42 तर सजनाने 14 चेंडूत 3 चौकार, एक षटकारासह नाबाद 24 धावा फटकावल्या. त्याआधी सलामीवीर हेली मॅथ्यूजने 17 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 29 धावांचे योगदान दिले. मात्र यास्तिका भाटिया, कर्णधार हरमनप्रीत कौर, नॅट सिव्हर ब्रंट अपयशी ठरल्या तर अमेलिया कर व पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी 17 धावा कढल्या. जोनासनने 21 धावांत 3, कॅपने 37 धावांत 2 बळी मिळविले.

विद्यमान विजेत्या मुंबईचा हा पाच सामन्यातील दुसरा पराभव आहे. याशिवाय डब्ल्यूपीएलच्या इतिहासात दिल्लीकडून झालेला त्यांचा हा आजवरचा केवळ दुसरा पराभव आहे. दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग चौथा विजय असून पाच सामन्यांत त्यांनी 8 गुण घेत पहिले स्थान मिळविले आहे. मुंबई त्यांच्यापेक्षा 2 गुणांनी मागे आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबईने दिल्लीला शेवटच्या चेंडूवर हरविले होते. त्या पराभवाची परतफेड दिल्ली मायभूमीतील लढतीत केली.

बेंगळूरमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात दिल्लीने मोठे यश मिळविले होते. तरीही दिल्लीतील या सामन्यात प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सामना पुढे सरकेल तसे प्रेक्षकांचे आगमन होऊ लागले. पण बेंगळूरसारखा प्रतिसाद येथे लाभला नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन करीत संघाला विजय मिळवून दिला. मागचा सामना हुकलेल्या मेरिझेन कॅपने पॉवरप्लेमध्येच मुंबईला धक्के देत विजयाचा पाया रचला. तिने यास्तिका व हरमनप्रीतचे बळी मिळविले तर शिखा पांडेने सिव्हर ब्रंटला बाद करीत मुंबईला अडचणीत आणले. 19 वर्षीय तितास साधूने अमेलिया करला बाद केल्यानंतर 9 व्या षटकात मुंबईचा निम्मा संघ तंबूत परतला होता. अमनजोत फटकेबाजी करून थोडीफार आशा निर्माण केली होती. पण धावगती वाढल्याने तिचे प्रयत्नही अपुरे पडले.

त्याआधी लॅनिंगने तिसरे अर्धशतक नोंदवताना 6 चौकार, 2 षटकार मारले. तिने तीन उपयुक्त भागीदारी नोंदवल्यानंतर जेमिमाने 8 चौकार, 3 षटकार ठोकत संघाला दोनशेच्या जवळपास मजल मारून दिली. शफाली वर्मानेही 12 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 28, अॅलीस कॅप्सेने 20 चेंडूत 19 धावा काढल्या. जेमिमाच्या फटकेबाजीमुळे दिल्लीला शेवटच्या पाच षटकांत 69 धावा मिळाल्या. जेमिमाने सिव्हर ब्रंटला षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले.

आज बुधवारी गुजरात जायंट्स व आरसीबी यांच्यात लढत होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स महिला 20 षटकांत 4 बाद 192 : लॅनिंग 38 चेंडूत 53, शफाली वर्मा 12 चेंडूत 28, कॅप्से 20 चेंडूत 19, जेमिमा रॉड्रिग्ज 33 चेंडूत नाबाद 69, कॅप 12 चेंडूत 11, अवांतर 8, मॅथ्यूज 1-23, वस्त्रकार 1-20, सायका इशाक 1-29.

मुंबई इंडियन्स महिला 20 षटकांत 8 बाद 163 : हेली मॅथ्यूज 17 चेंडूत 29, भाटिया 6, सिव्हर ब्रंट 5, हरमनप्रीत 6, अमेलिया कर 17, वस्त्रकार 17, अमनजोत कौर 27 चेंडूत 42, सजीवन सजना 14 चेंडूत नाबाद 24, अवांतर 11, जोनासन 3-21, कॅप 2-37, साधू व राधा यादव 1-23, शिखा पांडे 1-27.

Advertisement
Tags :

.