जपानच्या भूकंपात 48 जणांचा बळी
चोवीस तासांमध्ये 150 हून अधिक धक्के, मालमत्तेची प्रचंड हानी
► वृत्तसंस्था / वाजिमा
सोमवारी पहाटे नववर्षाच्या प्रथम दिली जपानमध्ये झालेल्या प्रचंड भूकंपात नव्या वृत्तानुसार 48 जणांचा बळी गेला आहे. मोठ्या प्रमाणात इमारती कोसळल्या असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली आणखी माणसे दबली गेली आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सोमवारचा भूकंप 7.6 रिष्टर क्षमतेचा होता.
या भूकंपामुळे आधी सुनामीचा इशारा देण्यात आला होता. तथापि, नंतर तो मागे घेण्यात आला. मोठी विनाशकारी सुनामी निर्माण झाली नाही. मात्र, भूकंप आणि नंतरचे अनेक छोटे धक्के यांच्यामुळेच मोठी हानी झाली आहे. किमान 500 इमारती कोसळल्याचे वृत्त असून पायाभूत सुविधांचीही हानी झाली आहे.
इशिकावामध्ये मोठी हानी
जपानच्या इशिकावा भागात या भूकंपाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला आहे. आतापर्यंत हाती सापडलेले सर्व 48 मृतदेह याच भागातील आहेत. तसेच गंभीर जखमी अवस्थेतील 16 जणांवर उपचार होत आहेत. अनेक भागांमध्ये वीजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा बंद झाला होता. तो आता टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहे. गेल्या तीन दशकांमधील हा सर्वात मोठा भूकंप आहे, असे बोलले जाते.
सर्वाधिक हानी घरांची
या भूकंपात सर्वाधिक हानी घरांची झाली आहे. ती इतकी मोठी आहे, की तिचे अद्याप अनुमान काढता आलेले नाही. या घरांमधील बव्हंशी नागरीक सुरक्षित स्थानी आश्रयाला गेले आहेत. वेळीच साहाय्यता कार्य सुरु करण्यात आल्याने अनेकांचे जीव वाचविणे शक्य झाले आहे. या भूकंपाच्या प्रभाव क्षेत्रात असणारी सर्व अणुवीज केंद्र सुरक्षित असून त्यांचे कार्य व्यवस्थित होत आहे.
पश्चिम भागात अद्यापही धक्के
मुख्य भूकंप होऊन 48 तासांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही जपानच्या पश्चिम भागात भूकंपाचे अनेक छोटे धक्के बसत आहेत. त्यामुळे साहाय्यता कार्यात बाधा येत आहे. मुख्य भूकंपाची तीव्रता प्रचंड असल्याने छोट्या धक्क्यांचे प्रमाणही मोठे आहे. अनेक स्थानी भूस्खलन झाल्याने महामार्ग आणि मार्गही खचले असून त्यांना मोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत होते. काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही खंडित झाला होता. आता साहाय्यता कार्यात योगदान देण्यासाठी काही सामाजिक संस्थाही पुढे आल्या असल्याची माहिती देण्यात आली.
सुनामी सौम्य
सुनामीची तीव्रता प्रथम जाणवली होती तेव्हढी नंतर राहिली नसल्याने मोठी हानी टळली, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. 17 फूट उंचीच्या लाटा उसळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, भूकंपाचे केंद्र सागरतटापासून लांब भूमीखाली असल्याने मोठ्या सुनामीचा धोका टळला.