चिलीच्या जंगलांमध्ये भडकली आग, 46 ठार
अध्यक्ष बोरिक यांच्याकडून आणीबाणी लागू
वृत्तसंस्था/ सँटियागो
चिलीच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीने आता भयानक रुप धारण केले ओ. या वणव्यामुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे या आगीवर नियंत्रण मिळविण्यास अद्याप यश आलेले नाही. आगीची तीव्रता सातत्याने वाढत असल्याने हजारो घरं जळून खाक झाली आहेत. याचबरोबर रस्त्यांवर अनेक लोकांचे जळालेले मृतदेह दिसून येत आहेत.
आगीचे भयानक स्वरुप पाहून अध्यक्ष गेब्रियल बोरिक यांनी देशाच्या मध्य आणि दक्षिण भागांमध्ये आणीबाणी लागू करण्याचा आदेश दिला आहे. चिलीमये सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरू आहे. येथील तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने चिंता आणखी वाढली आहे.
देशातील आगीचा वाढता कहर पाहता अध्यक्ष बोरिक यांनी शनिवारी हवाई पाहणी केली आहे. आगीमुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण हे होरपळले गेल्याने मृत्युमुखी पडले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आगीमुळे प्रभावित लोकांना पुन्हा स्वत:च्या पायांवर उभे करण्यासाठी सरकार मदत करणार असल्याचे अध्यक्ष बोरिक यांनी म्हटले आहे.
मध्य चिलीच्या समुद्र किनाऱ्यापासून वालपराइसो पर्यटन क्षेत्रातील विना डेर मार क्षेत्रात आगीमुळे प्रचंड प्रमाणात धूर पसरला आहे. यामुळे स्थानिक लोकांना स्वत:चे घर सोडणे भाग पडले आहे. चिलीच्या अधिकाऱ्यांनी प्रभावित क्षेत्रांमध्ये आपत्कालीन स्वरुपात संचारबंदी लागू केली आहे. विशेषकरून इंधन पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर संबंधित क्षेत्रांमधून लोकांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.