'प्रदूषण नियंत्रण' ची होणार दोन कार्यालये
कोल्हापूर / विनोद सावंत :
राज्य शासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकृतीबंधाला नुकतीच मंजूर मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी सध्या असणाऱ्या कार्यालयासोबतच आणखीन एक प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन करण्याचे प्रस्तावित केले आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता दोन प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यालय होणार आहेत.
उद्योग भवन येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय आहे. येथून कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवले जाते. सध्या या कार्यालयामध्ये अपुरा स्टाप असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी असणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे 23 साखर कारखाने, 12 हजार औद्योगिक आस्थापना, मोठी हॉस्पिटल, हॉटल्स, मद्य उद्योग 18, टेक्स्टाईल-फॉड्री 250 आणि 2 महापालिका, 10 नगरपालिकांच्या सांडपाण्यावर देखरेख ठेवण्यासाठी केवळ तीनच अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. काम जास्त आणि मनुष्यबळ कमी अशी स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदी, वारणा नदी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. या सर्वाचा विचार राज्य शासनाने आकृतीबंधमध्ये केला आहे. तीन महिन्यांपूर्वीच आकृतीबंधास मंजुरी मिळाली आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन विभाग करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही कार्यालयाकडे तालुकानिहाय औद्योगिक आस्थापनाची संख्या समान येतील अशा पद्धतीने त्यांचे क्षेत्र असणार आहे. विशेष म्हणजे सध्या कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी उपप्रादेशिक अधिकारी आणि तीन क्षेत्र अधिकाऱ्यांवर आहे. नवीन आकृतीबंधनुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी दोन विभागाला दोन प्रादेशिक अधिकारी, दोन उपप्रादेशिक अधिकारी आणि आवश्यकतेनुसार क्षेत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे प्रस्तावित केले आहे.
- सहा महिन्यात नवीन कार्यालय सुरू होणार?
नवीन आकृतीबंधनुसार स्टाप नियुक्त करणे, कामाचे स्वरूप निश्चित करणे यासाठी अवधी लागणार आहे. सहा महिन्यांत ही सर्व प्रक्रिय झाल्यानंतर दोन स्वतंत्र विभाग कार्यरत होतील, अशी अपेक्षा आहे.
- सध्याच्या कार्यालयातच होणार दोन कार्यालये
उद्योग भवन येथे सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय आहे. येथे कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी आहे. आकृतीबंधनुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी दुसरे कार्यालयही याच ठिकाणी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा कारभार सध्या सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार असणाऱ्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांच्या मदतील एक उपप्रोदशिक अधिकारी आहे. नवीन कार्यालयामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रादेशिक अधिकारी मिळणार आहे. त्यामुळे येथील कामकाज आणखीन गतीने होईल, अशी अपेक्षा आहे.
- आकृतीबंध कागदावर राहू नये
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सध्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी अपुरा स्टाप दिला गेला आहे. यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. आकृतीबंधमध्ये याचा विचार करून कोल्हापूर जिल्ह्यासाठी दोन विभाग सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतू दोन्ही विभागात पुरेसा स्टाप देणे आवश्यक आहे. राज्य शासनाने मंजूर केलेला आकृतीबंध तीन महिन्यापूर्वी मंजूर केला आहे. परंतू अंमलबजावणी अद्यपी झालेली नाही. हा आकृतीबंध कागदावर राहू नये, अशी प्रतिक्रियाही नागरिकांतून उमटत आहे.