काँग्रेसमधील 45 आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात!
कुमारस्वामींचा गौप्यस्फोट : निजदमधील सर्व आमदार एकत्र
बेंगळूर : निजदमधून कोणताही आमदार काँग्रेसमध्ये जाणार नाही. आपल्या पक्षातील सर्व आमदार आणि नेते संघटीत आहेत. काँग्रेसमधीलच 45 आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि निजदचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. निजदचे काही आमदार पक्ष सोडून जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे कुमारस्वामी यांनी हा गोंधळ दूर करण्यासाठी हासनमध्ये बुधवारी पक्षातील आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निजदमधील एकही आमदार पक्षातून बाहेर पडणार नाही. आम्ही सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे आहोत. कोणीही काँग्रेसच्या आमिषाला भुलून पक्ष सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
निजदमधील काही आमदार पक्ष सोडून जाणार असल्याच्या वृत्तामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा टाकण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे. आमच्यातील कोणीही पक्षत्याग करणार नाही. पक्षातील एकही आमदार नाराज नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीन दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी मंत्र्यांना अन्य पक्षातील नेत्यांना काँग्रेसमध्ये आणण्यास सांगितले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या पक्षातील आमदार काँग्रेसमध्ये येणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतील. निजदच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन एकीचे प्रदर्शन केले आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसमधीलच 45 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या आमदारांना रोखण्यासाठी काँग्रेस नेते कसरत करत आहेत. भाजप, निजदचे आमदारच काँग्रेसमध्ये येणार असल्याचे सांगत आहेत. जनतेने काँग्रेसला बहुमत देऊन सेवा करण्याची संधी दिली आहे, तरी सुद्धा काँग्रेस नेते दुसऱ्या पक्षातील आमदारांना का आमिष दाखवत आहेत, असा परखड प्रश्न कुमारस्वामी यांनी उपस्थित केला.
एकही आमदार घेऊन जाणे भाजपला अशक्य : शिवकुमार
आमच्या पक्षातील एकही आमदार घेऊन जाणे, भाजप नेत्यांना शक्य नाही. प्रयत्न अयशस्वी ठरतील, याची जाणीव त्यांना आहे, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी ते बोलत होते. लोकसभा निवडणूक कालावधीत गोंधळ निर्माण करण्यासाठी भाजप नेते ‘ऑपरेशन कमळ’चे प्रयत्न करत आहेत. सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते मोडून काढले जातील. भाजपची प्रत्येक रणनीती आपल्याला ठाऊक आहे. भाजप नेत्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ते जनतेची दिशाभूल होईल, अशी विधाने करत आहेत, अशी टिकाही शिवकुमार यांनी केली.