जिल्ह्यातील 248 ग्रा. पं. मध्ये 44 कोटींचा अपहार
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिला टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिह्यातील 248 ग्रामपंचायतींमध्ये तब्बल 44 कोटी 47 लाखांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. यामध्ये हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक 35 कोटी 25 लाखांचा अपहार झाला आहे.
जिह्यात ग्रामपंचायतीत होणाऱ्या अपहारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने कंबर कसली आहे. अपहार झाल्यास कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबत सीईओ कार्तिकेयन एस. यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. ग्रामसेवक व अन्य कर्मचाऱ्यांची अपहार प्रकरणाबाबत सुरु असणारी चौकशी त्वरित पूर्ण करुन अहवाल सादर करावेत. दोषींवर तत्काळ कारवाई करून अपहारातील रक्कम वसूल करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अपेक्षित अपहार रक्कम वसूल करण्याचे निर्देश जिह्यात अनेक मोठ्या महसुली ग्रामपंचायती आहेत. येथे अनेक अपहारांच्या घटना आणि गुंतलेली रक्कम यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत या प्रकारणांमध्ये वाढ झाल्याने प्रशासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा अनेक तक्रारी जि. प. कडे आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागातर्फे विशेष सूचना दिल्या आहेत. संशयित अपहार प्रकरणांमध्ये संबंधित जबाबदार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून कायमस्वरूपी अपहाराच्या रकमा वसूल करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत.
- 28 फेब्रुवारीपर्यंत अपहार निश्चित
जिह्यातून 248 ग्रामपंचायतींमध्ये अपहार झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागकडे प्राप्त झाली. यापैकी काही ग्रामपंचायतींकडून अनुपालन अहवाल सादर केला आहे. त्याची फेरपडताळणी करून अपहाराची रक्कम निश्चित केली जाणार आहे. तर उर्वरित ग्रामपंचायतींच्या अपहाराची चौकशी करून कागदपत्रांची तपासणी करून 28 फेब्रुवारीपूर्वी अपहार निश्चित केला जाणार आहे. यामध्ये जे ग्रामसेवक अथवा पदाधिकारी दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. सीईओ कार्तिकेयन एस. यांच्या निर्देशानुसार या अपहाराची तपासणी करण्यासाठी डिसेंबरपासून शिबिरांचे आयोजन केले आहे.
-अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर
- प्रलंबित अपहार प्रकरणातील ग्रामपंचायतींची संख्या
तालुका ग्रामपंचायतींची संख्या एकूण गुंतलेली रक्कम
गडहिंग्लज 12 14 लाख 28 हजार
गननबावडा 04 08 लाख 28 हजार
आजरा 11 20 लाख 26 हजार
कागल 06 22 लाख 40 हजार
चंदगड 09 58 लाख 23 हजार
शाहूवाडी 24 60 लाख 17 हजार
शिरोळ 55 6 कोटी 51 लाख 26 हजार
करवीर 20 87 लाख 51 हजार
हातकणंगले 107 35 कोटी 25 लाख
एकूण 248 44 कोटी 47 लाख 39 हजार