नूतनीकरणावर 43 कोटी, पायाभूत सुविधांची वानवा
कोल्हापूर :
रेल्वे स्टेशन येथे 43 कोटींच्या निधीतून नुतनीकरणासह सुशोभिकरणाची कामे केली जात आहेत. या कामाचा सध्याच्या घडीला फायदा कमी आणि तोटाच जास्त होताना दिसून येत आहे. नुतनीकरणाच्या नावाखाली सुस्थितमध्ये असणारे स्वच्छतगृह पाडण्यात आले. प्रस्तावित निधीतून नव्याने स्टेशनमध्ये बांधण्यात येत असलेले स्वच्छतागृहाचे कामही बंद पडले आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक‘ योजनेतून कोल्हापूर रेल्वे स्थानकाला 43 कोटींचा निधी मिळाला आहे. वास्तविक यामधून प्रवाशांच्या सेवा सुविधा कशा पद्धतीने चांगल्या देता येईल, अशा कामांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. यामध्ये काही कामे प्रवाशांच्या सोयीची होत आहेत. परंतू काही ठिकाणी सुशोभिकरणावर कोट्यावधीचा खर्च होत आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोयही होताना दिसून येत आहे.
यामध्ये तिकीट घरांची टोलेजंग इमारत उभारली आहे. परंतू पार्कींगची जागा सुशोभिकरणासाठी वापरली गेली आहे. सिमेंटचे पिलर लावले आहेत. मुळातच रेल्वे स्टेशनची पार्कींगची जागा अपुरी आहे. यामध्ये सुशोभिकरण केले जात आहे. यामुळे प्रवाशांना चारचाकी वाहने कुठे लावायची असा प्रश्न निर्माण होतो. तसेच रिक्षा व्यावसायिकही याच ठिकाणी पूर्वी थांबत होते. त्यांनाही पुरेसी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे रेल्वे सुटण्याच्यावेळी किंवा लांब पल्याच्या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर स्टेशनसमोर पार्कींगचा बट्याबोळ उडालेला असतो.
वरिष्ठांनी विचारणा केल्यानंतर तरी प्रश्न मार्गी लागणार काय?
सुशोभिकरणाच्या कामामुळे मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी नुकतेच ठेकेदाराला धारेवर धरले. दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. यानंतर तरी स्वच्छतागृहासह अन्य प्रश्न मार्गी लागणार काय असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित होत आहे.
वेटिंगमधीलही स्वच्छतागृह बंद
नूतनीकरणाच्या कामामुळे सुस्थितीमध्ये असणारे स्वच्छतागृह पाडले. वर्ष झाले तरी स्टेशनवर स्वच्छतागृहाची सोय केलेली नाही. वेटींगरूम मधीलही स्वच्छतागृह गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. नवीन स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरू केले आहे. परंतू तेही निम्यात थांबले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच रेल्वे स्टेशनवर बचत गटाचे स्टॉल आहेत. चाईल्ड हेल्पलाईन केंद्र आहे. येथील स्टापचीही गैरसोय होत आहे.
सुशोभिकरणामुळे एसटी बस थांब हटविला
रेल्वेतून प्रवाशी उतरल्यानंतर त्यांच्या सोयीसाठी स्टेशनसमोर एसटीचे बसस्थानक होते. सुशोभिकरणाच्या कामामुळे येथील बसस्थानक हटविला आहे. एसटी प्रवाशांची गैरसोय होत आहे. एकीकडे सुशोभिकरण, नूतनीकरणावर कोट्यावधी खर्च केला जात आहे. दुसरी या कामामुळे नागरिकांची गैरसोयही होत आहे.
वर्षभरापासून रेल्वे स्टेशन येथील स्वच्छतागृह बंद आहे. स्वच्छतागृहाबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले आहे. वास्तविक पर्यायी व्यवस्था करूनच जुने स्वच्छतागृह पाडणे गरजेचे होते. परंतू तसे केलेले नाही. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वेकडून प्रवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे तत्काळ स्वच्छतागृहाची सोय करावी.
शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभाग रेल्वे प्रवाशी सल्लागार समिती