सह्याद्रीनगर येथून सेंट्रींगच्या 43 प्लेटची चोरी
एपीएमसी पोलिसात तक्रार : चोरीचा छडा लावण्याची मागणी
बेळगाव : सह्याद्रीनगर येथे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरातून सेंट्रींगच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना सोमवार दि. 13 रोजी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी स्लॅब घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सेंट्रींगच्या लोखंडी 43 प्लेट पळविल्या आहेत. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम हाती घेतले आहे. श्रीनिवास देवाप्पा भातकांडे (रा. सावगाव) यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. श्रीनिवास हे सेंट्रींग मेस्त्री असून सह्याद्रीनगर येथे नव्याने सुरू असलेल्या घराचे काम ते करत आहेत. पहिल्या मजल्याचे स्लॅब पूर्ण झाले असून दुसऱ्या मजल्याचे काम लवकरच सुरू केले जाणार होते. त्यामुळे स्लॅब घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण 171 प्लेट त्यांनी चार थर लावून ठेवल्या होत्या. मात्र चोरट्यांनी रविवारी रात्री त्यापैकी 43 प्लेट पळविल्या आहेत.
नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरमालकाने त्याठिकाणी वॉचमनची नियुक्ती केली आहे. मात्र वॉचमनला याचा थांगपत्ता लागला नाही. प्लेट ठेवलेल्या ठिकाणी दिसून न आल्याने सोमवारी सकाळी गवंडी कामगारांनी सेंट्रींग मेस्त्रीला फोनवरून विचारणा केली. त्यानंतर भातकांडे यांनी कामाच्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली असता प्लेट चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत वॉचमनकडे विचारपूस करण्यात आली. मात्र आपणाला काहीच माहिती नसल्याचे सांगत वॉचमनने हात वर केले. त्यामुळे त्यांनी एपीएमसी पोलीस स्थानक गाठून घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी वॉचमनकडे चौकशी केली. पण आपणाला काही माहिती नसल्याचे सांगितल्याने पोलिसांनी वॉचमनची कानउघाडणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. त्यावेळी त्यामध्ये विनानंबर प्लेटचे वाहन त्याठिकाणाहून गेल्याचे दिसून आले.
याच बांधकामावर पुन्हा चोरी
यापूर्वीही सदर कामावरून लोखंड चोरीला गेले होते. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. एका प्लेटची किंमत 1500 रुपये असून 43 प्लेट चोरीला गेल्या असल्याने सेंट्रींग मेस्त्री भातकांडे यांचे 64,500 रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करावा, अशी मागणी केली जात आहे.