For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयुर्मान संपलेल्या बसेसचा प्रश्न ऐरणीवर

12:08 PM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
आयुर्मान संपलेल्या बसेसचा प्रश्न ऐरणीवर
Advertisement

परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसेसचा भरणा; प्रवासही असुरक्षित

Advertisement

बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात आयुर्मान संपलेल्या जुन्या बसेसचा भरणा अधिक असल्याने सार्वजनिक बस व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. बसेस रस्त्यावरच नादुरुस्त होऊन बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यातील जुन्या बसेसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधीच शक्ती योजनेमुळे बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच जुन्या आयुर्मान संपलेल्या बसेसनी डोकेदुखी वाढली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून 650 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. यामध्ये 150 हून अधिक बसेस जुन्या आयुर्मान संपलेल्या आहेत. मात्र परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने जुन्या बसेस चालविल्या जात आहेत. परिवहनच्या तिजोरीत आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. दरम्यान नवीन बस खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे जुन्या बसेसवरच परिवहनचा डोलारा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी बीएमटीसीकडून परिवहनने जुन्या बसेस कमी किमतीत खरेदी केल्या होत्या. अशा बसेस विविध मार्गांवर सोडल्या जात आहेत. मात्र या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. रस्त्यात पंक्चर होणे, बंद पडणे, ब्रेक निकामी होणे आणि इतर कारणांमुळे बससेवेत अडचणी येऊ लागल्या आहेत.

सत्तेतील सरकारने शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. दरम्यान विविध मार्गांवर बसेसचा तुटवडा प्रकर्षाने जाणवू लागला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची मोठी हेडळसांड होत आहे. परिणामी अनियमित आणि अपुऱ्या बससेवेमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. त्यातच नादुरुस्त बस विविध मार्गांवर सोडल्या जात असल्याने सार्वजनिक बस वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. शिवाय बसचा प्रवासही असुरक्षित होऊ लागला आहे. परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. काही शाळांमध्ये जादा क्लासचे आयोजन केले जात आहे. मात्र बसेसचा तुटवडा असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. शैक्षणिक जीवनावर परिणाम होत असल्याची तक्रारही पालक, शिक्षकांतून व्यक्त होत आहे. यात्रा-जत्रा आणि पर्यटनस्थळांसाठी विशेष बस धावत आहेत. त्यामुळे दैनंदिन मार्गावर बसेसची कमतरता जाणवत आहे. परिणामी नाईलाजास्तव परिवहन आयुर्मान संपलेल्या जुन्या बस चालवत आहे. त्यामुळे दैनंदिन मार्गावर या बसेसच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.