जंपीरा चिकन जातीचे 42 बेडूक जप्त
कारवार वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
कारवार : कारवारहून गोव्याकडे चोरटी वाहतूक करण्यात येत असलेले जंपीरा चिकन (इंडियन बुल) जातीचे 42 बेडूक मंगळवारी सकाळी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी येथील खापरी देवस्थानाजवळ जप्त केले. याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की, जंपीरा चिकन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेडकांच्या मांसापासून तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांना हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे काही वर्षापूर्वी कारवारसह परिसरातील बेडकांची चोरटी वाहतूक केली जात होती. त्यावेळी हा व्यवसायही बऱ्यापैकी फोफावला होता. तथापी पर्यावरणप्रेमींनी बेडकांच्या तस्करीच्या विरोधात आवाज उठविल्याने या व्यवसायावर ब्रेक लागला होता. तथापी मंगळवारी सकाळी कारवारहून गोव्याकडे निघालेल्या एका खासगी बसची वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बसच्या डिक्कीमध्ये पिशवीत 42 बेडूक लपवून ठेवल्याचे आढळून आले. ही खासगी बस गेल्या अनेक वर्षांपासून कारवार ते गोवा अशी रोज ये-जा करीत असते. बसच्या चालकाला आणि मालकाला ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. चौकशीअंती बेडकांच्या तस्करीच्या पाठीमागे नेमका कुणाचा हात आहे हे स्पष्ट होणार आहे.दरम्यान बेडकांच्या चोरट्या वाहतुकीमागे टोळी तर कार्यरत नाही ना? असा संशय व्यक्त होत आहे.