विश्वचषक खो-खो स्पर्धेत 41 संघ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
13 ते 19 जानेवारी दरम्यान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविल्या जाणाऱ्या पहिल्या विश्वचषक पुरुष आणि महिलांच्या खो-खो स्पर्धेत आतापर्यंत पुरुष गटात 21 तर महिला गटात 20 संघांनी आपला सहभाग दर्शविला आहे.
या स्पर्धेला शौकिनांकडून चांगला प्रतिसाद लाभत असल्याने सहभ्घगी होणाऱ्या संघांच्या संख्येत वाढ होत आहे. सुरुवातीला या स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या विभागात प्रत्येकी 16 संघांनी आपला सहभाग दर्शविला. पण त्यानंतर संघांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले. या स्पर्धेमध्ये आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, द. अमेरिका, युरोप आणि ओसेनिया या सहा खंडातील संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन 13 जानेवारीला होणार आहे. त्यानंतर यजमान भारत आणि पाक यांच्यात पहिला सामना खेळविला जाईल. या स्पर्धेची साखळी फेरी 14 ते 16 जानेवारी दरम्यान होणार असून त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 जानेवारीला खेळविले जातील. 19 जानेवारीला या स्पर्धेतील अंतिम सामना होईल.
सहभागी झालेले संघ खालील प्रमाणे
आफ्रिका-पुरुष, घाना, केनिया, दक्षिण आफ्रिका
महिला-केनिया, द. आफ्रिका, युगांडा
आशिया-पुरुष बांगलादेश, भूतान, यजमान भारत, इराण, मलेशिया, नेपाळ, पाक, द.कोरिया व श्रीलंका
महिला-बांगलादेश, भूतान, यजमान भारत, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, नेपाळ, पाक, द. कोरिया व श्रीलंका
युरोप-पुरुष- इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड्स, पोलंड
महिला-इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड्स, पोलंड
द. अमेरिका-पुरुष अमेरिका
उत्तर अमेरिका-पुरुष-अर्जेंटिना, ब्राझील, पेरु
महिला- पेरु
ओसेनिया-पुरुष ऑस्ट्रेलिया
महिला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड