दोन दिवसात शहर परिसरातील 41 कुत्र्यांचे लसीकरण
बेळगाव : महानगरपालिका आणि पशुसंगोपन खात्याच्या संयुक्त विद्यमाने शहर व उपनगरातील भटक्या कुत्र्यांना अँटी रॅबीजची लस टोचली जात आहे. गुरुवारी 26 तर शुक्रवारी 15 अशा एकूण दोन दिवसात 41 भटक्या कुत्र्यांना लस टोचण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या प्रस्तावानुसार पशुसंगोपन खात्याकडून भटक्या कुत्र्यांना लस टोचली जात आहे. 28 ऑक्टोबर या जागतिक रेबिज दिनाच्या औचित्य साधून लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. तब्बल महिनाभर ही मोहीम शहर व उपनगरातील विविध भागांमध्ये राबविली जाणार आहे. पशुसंगोपन खात्याचे तालुका पशु वैद्याधिकारी डॉ.आनंद पाटींल यांनी तालुक्यातील विविध डॉक्टरांची या मोहिमेसाठी नियुक्ती केली आहे. दररोज एका डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली याचे सहकारी कुत्र्यांना लस टोचत आहे. सध्या केवळ महानगरपालिकेच्या हद्दीतच कुत्र्यांना लस टोचली जात आहे. मात्र शहरालगतच्या ग्राम पंचायतींच्या हद्दीतही भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील कुत्र्यांनाही लस टोचण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. केवळ लसीकरणापुरता मर्यादित न राहता त्याचे निर्बिजीकरण करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.