Solapur : सोलापुरात 40 हजार अभियंत्यांना मिळणार आता नोकरीची संधी !
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रस्ताव पाठविला शासनाकडे
सोलापूर : सोलापुरात आयटी पार्क उभे करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परिपूर्ण असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.जिल्हाधिकारी यांच्या दूरदृष्टीमुळे आयटी कंपनी व्यवस्थापनास सर्वात रास्त दरात जागा मिळणार असल्याने सुमारे ३५ ते ४० हजार अभियंत्यांना सोलापुरात नोकरीची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयटी पार्कसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी होटगी येथील जलसंपदा विभागाची जागा हेरुन केवळ ४५ कोटी रुपयांत आयटी पार्कची संपूर्ण इमारत उभी करण्याचे नियोजन आखले आहे. जागेसाठी केवळ साडेतीन कोटी रुपयांचा निधी जलसंपदा विभागास द्यावा लागला आहे. त्यामुळे राज्य शासनावरही आयटी पार्कसाठी विशेष आर्थिक भार पडला नाही. याशिवाय आयटी पार्कसाठी केवळ तीन रुपयांत वीजपुरवठा करण्यासाठी पुढाकार जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.
त्यामुळे सोलापुरातील नियोजित आयटी पार्क आतापासूनच आयटी क्षेत्रासाठी खुणावत आहे. दीड वर्षात सोलापुरात आयटी पार्कची इमारत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने सोलापुरातील युवकांत आता मोठे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.आयटी पार्कसंदर्भात येत्या काही दिवसांत उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन हा विषय लवकरच मार्गी लागणार आहे. सोलापूरच्या आयटी पार्कसाठी राज्य सरकारकडूनही हालचाली वाढल्या आहेत.
आयटी येथील पार्कसाठी सुरुवातीला हिरज, कुंभारी, जुनी मिल, होटगी जागेची पाहणी करण्यात आली. यात होटगी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. होटगी येथे जलसंपदा विभागाच्या मालकीची ५० एकर जागा ही लॉ जिस्टिक पार्कसाठी देण्यात आली असून, आता तीच जागा आयटी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
होटगी रोडवरील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सध्या २० केपीएलडी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प असून, त्यांचा हा प्रकल्प येत्या वर्षभरात १०० केपीएलडी क्षमतेचा होणार आहे. यात झिरो लिक्विड डिस्चार्ज (झेएलडी) तंत्राचा वापर केल्याने मळीचा वास हा शून्यावर येणार आहे. विमानतळावरुन उडणाऱ्या विमानसेवेच्या फनेलमध्ये प्रस्तावित आयटी पार्क इमारतीचा समावेश होत नाही.
५० मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येते. याबाबत होटगी रोडवरील विमानतळ प्रशासनाचा अभिप्राय घेण्यात आला आहे. तसेच होटगी येथील प्रस्तावित आयटी पार्क जागेच्या ५० एकरावर सुमारे ४० ते ४५ हजार जण बसून काम करतील इतकी क्षमता असणार आहे. पुण्याच्या हिंजवडीपेक्षा अर्ध्या किमतीने स्वस्तात होटगी येथे जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे आता आयटी पार्कचे सोलापूरकरांचे स्वप्नही लवकरच साकार होणार आहे.