For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुवैतमध्ये 40 भारतीयांचा मृत्यू

06:58 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुवैतमध्ये 40 भारतीयांचा मृत्यू
Advertisement

कामगार राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये भीषण आग, 50 हून अधिक जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई, कुवैत

कुवैतमधील मंगाफ शहरात विदेशी कामगार राहत असलेल्या बहुमजली अपार्टमेंटमध्ये बुधवारी भीषण आग लागली. या अपघातात 40 हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. बहुतेक मृत्यू धुरामुळे गुदमरल्याने झाले आहेत. मृतांमध्ये 5 लोक केरळचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. या भीषण दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींच्या निर्देशानुसार, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग आगीत जखमी झालेल्या भारतीयांच्या मदतकार्याची देखरेख करण्यासाठी आणि मृतांची पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी कुवैतला रवाना झाले आहेत.

Advertisement

कुवैतच्या दक्षिण अहमदी गव्हर्नरेटच्या मंगाफ भागात असलेल्या सहा मजली इमारतीत बुधवारी पहाटे आग लागली. या दुर्घटनेत सुरुवातीला अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या स्वयंपाकघरात आगीचा भडका उडाला. त्यानंतर ती इतर मजल्यांमध्ये पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या इमारतीत जवळपास 200 लोक राहत होते. ते सर्वजण एकाच कंपनीचे कामगार असून त्यातील बहुतांश जण भारतीय आहेत. दरम्यान, भारतीय राजदूत आदर्श स्वैकाही घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी जखमींची भेट घेत कामगारांविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या भारतीय दुतावास जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे.

अपार्टमेंट ‘एनबीटीसी’ ग्रुपचे

आगीची दुर्घटना घडलेले अपार्टमेंट मल्याळम व्यापारी के. जी. अब्राहम यांच्या ‘एनबीटीसी’ ग्रुपचे आहे. ठार झालेले लोक या कंपनीत काम करत होते. रिपोर्टनुसार, के. जी. अब्राहम हे केरळमधील तिऊवल्ला येथील व्यापारी आहेत. त्यांची कंपनी 1977 पासून कुवैतच्या तेल आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे.

अपार्टमेंट मालकाला अटक करण्याचे आदेश

कुवैतचे उपपंतप्रधान शेख फहद युसेफ सौद अल-सबाह यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या भीषण आगीसाठी त्यांनी रिअल इस्टेट मालकाला जबाबदार धरले आहे. उपपंतप्रधान शेख फहद यांच्याकडे गृहखात्याची तसेच संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी असून त्यांनी इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. स्थावर मालमत्ताधारकांच्या लोभापोटी अशा घटना दुर्दैवाने घडतात. जास्त भाड्याच्या लालसेपोटी इमारतीचे मालक एकाच खोलीत अनेकांना सामावून घेतात. अशा मानसिकतेमुळे सुरक्षिततेची पातळी धोक्मयात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अपार्टमेंटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक

तळमजल्यावरील स्वयंपाकघरात लागलेली आग झपाट्याने पसरल्याने लोक आतमध्ये अडकले. या इमारतीत बहुतांश स्थलांतरित मजूर राहतात. अनेक लोक बेकायदेशीरपणे राहत असल्याचेही सांगितले जात आहे. बचाव पथकाने इमारतीतून अनेकांना वाचवले. पण दुर्दैवाने आगीच्या धुरामुळे गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला. इमारतीच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक राहत असल्याचे दिसून आल्याने संबंधित अपार्टमेंट मालकावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधानांच्या शोकभावना

कुवैतमधील इमारतीला लागलेल्या आगीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. “कुवैतमधील आगीची घटना दु:खद आहे. या अग्नितांडवात ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. कुवैतमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अधिकारीही मदत करत आहेत.” असे ट्विट पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे.

हेल्पलाईन क्रमांक जारी

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी हेल्पलाईन क्रमांक जारी केल्याची माहिती दिली.  कुवैतमधील भारतीय दुतावासाने आपत्कालीन क्रमांक (+965-65505246) जारी केला आहे. या फोन नंबरवर कॉल करून लोक आपल्या प्रिय व्यक्तीची माहिती मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले. “कुवैत सिटीमध्ये आगीची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. या दुर्घटनेत 40 हून अधिक कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 50 हून अधिक लोक ऊग्णालयात दाखल आहेत. आमचे राजदूत घटनास्थळी गेले आहेत. आम्ही पुढील माहितीची वाट पाहत आहोत.” असेही त्यांनी सांगितले.

कुवैतची 70 टक्के लोकसंख्या विदेशी

कुवैतच्या एकूण 48 लाख लोकसंख्येपैकी केवळ 30 टक्के लोक कुवैतीयन तर  70 टक्के लोक विदेशी आहेत. सध्या तेथे सुमारे 10 लाख भारतीय नागरिक राहत आहेत. हळुहळू मोठ्या संख्येने परदेशी लोकांना आकर्षित करून कुवैत हा विदेशी-बहुल प्रदेश बनला आहे. मात्र, आर्थिक आव्हानांमुळे तेथे स्थलांतरितविरोधी भावना आता तीव्र होत आहेत. अशा परिस्थितीत, कुवैत सरकारने लोकसंख्येतील परदेशी लोकांची संख्या 70 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Advertisement
Tags :

.