Sugarcane Crop: यंदाही पळवापळवी, ऊसासाठी होणार मारामारी, क्षेत्र 40 हेक्टरने कमी
राज्यात ऊस पळविण्यासाठी कारखान्यांत मारामारी होण्याची शक्यता
By : विनायक जाधव
सांगली : राज्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी ४० हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र घटले आहे. त्यातच राज्यातील गतवर्षी बंद असलेले नऊ कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांची संख्या वाढत असताना ऊसाचे घटते क्षेत्र यामुळे राज्यात ऊस पळविण्यासाठी कारखान्यांत मारामारी होण्याची शक्यता आहे.
तसेच यावर्षीचा गाळप हंगामही आता २०२६ च्या फेब्रुवारी महिन्यातच संपुष्टात येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात गेल्यावर्षी १४ लाख ०५ हजार हेक्टरवर ऊसाचे उत्पादन घेण्यात आले होते. यावर्षी १३ लाख ७० हजार हेक्टरवरच ऊसाची लागवड झाली आहे.
त्यामुळे याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सध्या उपलब्ध असणारा ऊस हा खोडवा आहे. त्यामुळे त्याचा उताराही कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात यंदा २२० कारखाने ऊस गाळप करण्याची शक्यता
राज्यात गेल्या पाच वर्षापासून कारखान्याची संख्या वाढत चालली आहे. गेल्यावर्षी राज्यात एकूण २११ कारखान्यांनी गाळप केले होते. यावर्षी ती संख्या २२० होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हयाचा विचार केला तर सांगली जिल्हयात बंद असणारे दोन कारखाने यशवंत आणि तासगाव सुरू होत आहेत.
तसेच इतर जिल्ह्यातही बंद असणारे काही कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. यावर्षी गाळपासाठी काही खासगी कारखान्यांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच अनेक कारखान्यांनी त्यांची क्षमता वाढविली आहे. त्यामुळे त्यांना लागणारा ऊस ही वाढणार आहे. त्यामध्येच यावर्षी ऊसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे त्याचाही फटका सर्वच कारखान्यांना बसणार आहे.
सीमाभागातील कारखान्यांना ऊस मिळण्याची शक्यता कमी
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांचे नेहमी लक्ष हे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसावर असते आणि ते अॅडव्हान्स पेमेंट करून हा ऊस नेत असतात. या कारखान्यांची नोंदी घेणारे पथक या दोन्ही जिल्हयात सध्या फिरताना दिसून येत आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातीलच कारखान्यांना ऊस कमी पडत असताना या सीमाभागातील कारखान्यांना ऊस मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. सध्याच्या स्थितीत तर शेतकरी हक्काच्या कारखान्यांना ऊस घालण्याच्या मानसिकतेत दिसून येत आहे. त्यामुळे सीमाभागातील कारखान्यांना ऊस जाणार नाही.
अनेक कारखान्यांनी आतापासूनच फिल्डींग लावली
अनेक कारखान्यांनी यावर्षी आपल्याला गाळपासाठी कमी ऊस मिळणार आहे. त्यामुळे सभासदांच्या ऊसाची नोंद घेणे त्यांना तातडीने तोड कशी मिळेल, तसेच तोडणी कामगारांचे नियोजन या सर्व गोष्टी आतापासूनच करून ठेवल्या आहेत. त्यामुळे काही कारखान्यांची फिल्डींग चांगलीच लागली आहे. त्यांना ऊस कमी पडण्याची शक्यता कमी आहे. पण ज्या कारखान्यांनी मात्र हलगर्जीपणा केला आहे त्यांना मात्र ऊस निश्चितच कमी पडू शकतो.