40 वर्षांपासून दगड फोडण्याचे काम
एकीकडे अनेक देशांनी प्रगती केली असून लोक स्वतःचे जीवन उत्तमरित्या जगत आहेत. तर जगात काही असे देश देखील आहेत, जेथे लोक दिवसभर घाम गाळून देखील स्वतःच्या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकत नाहीत. आफ्रिकेत एक असा देश देखील आहे, जेथे लोक मागील 40 वर्षांपासून दगड फोडण्याचे काम करत आहेत. पश्चिम आफ्रिकन देश बुर्किनो फासोची राजधानी उआगेडूगूमध्ये ग्रेनाइटची खाण असून त्यात लोक मागील 40 वर्षांपासून घाम गाळताना दिसून येतात. त्यांच्याकडे कमाईसाठी केवळ हाच पर्याय असल्याने खाणीत घाम गाळणे हाच एकमेव मार्ग त्यांच्यासमोर आहे.
40 वर्षांपूर्वी मध्य उआगेडूगूमध्ये पिसी जिल्हय़ाच्या मधोमध एक मोठा खड्डा खणला गेला होता. हा खड्डा ग्रेनाइटच्या खाणीचा आहे. त्यावेळी गरीबीत जगणाऱया लोकांसाठी ही खाण उदरनिर्वाहाचे साधन ठरली होती. आज देखील हीच स्थिती आहे.
मागील 40 वर्षांपासून लोक याच खाणीत खोदकाम करत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या खाणीचा कुणीच मालक नाही. सर्व लोक येथे खोदकाम करून आणि ग्रेनाइट विकून पैसे कमावितात. येथे मुले, महिला आणि पुरुष दररोज 10 मीटर खेल खड्डय़ात उतरून ग्रेनाइट वर आणतात, डोक्यावर मोठा भार घेऊन त्यांना या खाणीतून चढून यावे लागते. अनेकदा हे लोक घसरून खाली देखील पडतात. लोकांकडून ग्रेनाइड थेट विकला जातो आणि याचा वापर इमारतींकरता केला जातो. दिवसभर मेहनत करूनही येथील लोकांची फारशी कमाई होत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत काम केल्यावर एका व्यक्तीला केवळ 130 रुपये मिळतात.