सौदीत मिळाले 4 हजार वर्षे जुने शहर
50 हून अधिक घरं, 14 किमी लांब भिंत
सौदी अरेबियात सुमारे 4 हजार वर्षे जुन्या एका शहराचा शोध पुरातत्व तज्ञांनी लावला आहे. सौदीत एका वाळवंटात हरवलेल्या 4 हजार वर्षे जुन्या किल्लेवजा शहराच्या शोधामुळे त्या काळात जनजीवत शहरी राहणीमानात बदलत होते असे स्पष्ट होत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. उत्तर-पश्चिम सौदीत मिळालेल्या या प्राचीन शहराचे नाव अल-नताह आहे. हे शहर दीर्घकाळापासून खैबरच्या भिंतींनी वेढलेल्या नखलिस्तानात हरवले होते. या क्षेत्रात प्राचीन काळातही प्रगत संस्कृती होती याचा पुरावा या शोधामुळे मिळाला आहे. या अध्ययनाचा तपशील प्लस वन नावाच्या एका नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
खैबरच्या वाळवंटी भागातील हे स्थळ प्रारंभिक कांस्य युगाच्या भटक्यापासून स्थिर जीवनशैलीतील बदलाशी थेट जोडलेले आहे. फ्रेंच पुरातत्व तज्ञ गिलाउम चार्लोक्स यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या संशोधनात प्राचीन 50 हून अधिक वेगवेगळी घरं आणि एक 14.5 किलोमीटर लांब भिंत शोधण्यात आली आहे. ही भिंत प्राचीन शहरानजीक निर्माण करण्यात आली होती असे फ्रेंच-सौदी संशोधकांच्या टीमने म्हटले आहे.
सुमारे 500 लोकांचे वास्तव्य
हे त्या काळातील मोठे शहर होते, तेथे सुमारे 500 लोक राहत होते. प्रारंभिक कांस्य युगादरम्यान या वस्तीला सुमारे ख्रिस्तपूर्व 2400 सालाच्या आसपास वसविण्यात आले होते आणि ख्रिस्तपूर्व 1400 सालापर्यत येथे जीवन राहिले असेल. एक हजार वर्षानंतर हे स्थळ निर्जन झाले. परंतु याच्या रहिवाशांनी शहरातून काढता पाय का घेतला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. अल-नताहची निर्मिती झाली तेव्हा वर्तमान सीरियापासून जॉर्डनपर्यंत भूमध्य समुद्राचे किनारे लेवंत क्षेत्रात बहरत होते असे संशोधकांचे सांगणे आहे.
त्या काळात उत्तर-पश्चिम अरबस्थानाला ओसाड वाळवंट मानले जात होते, त्यावेळी भटके सुमदाय येथे राहायचे आणि येथे अनेक दफनभूमी होत्या. 15 वर्षांपूर्वी पुरातत्व तज्ञांनी खैबरच्या उत्तर दिशेला तायमाच्या न खलिस्तानमध्ये कांस्य युगाच्या प्राचीराचा शोध लावला होता. याच पहिल्या आवश्यक शोधाने वैज्ञानिकांनी या वाळवंटात अधिक शोध घेण्यासाठी प्रेरित केले होते.
बेसॉल्ट नावाच्या काळ्या ज्वालामुखीय खडकांनी अल-नताहच्या भिंतीना पूर्णपणे व्यापले होते. याचमुळे हे स्थळ अवैध उत्खननापासून वाचले आहे. स्थळाचे वरून अवलोकन करण्यापासून संभाव्य मार्ग अणि घरांच्या पायांचे अध्ययन केले असता पुरातत्वतज्ञांना कुठे उत्खनन करण्याची गरज आहे हे समजले. उत्खननात मिळालेल्या पायामुळे हे कमीतकमी एक किंवा दोन मजली घरांसाठी होते हे स्पष्ट होते असे चार्लोक्स यांनी सांगितले आहे.
प्रारंभिक निष्कर्ष 2.6 हेक्टरच्या शहराचे चित्र निर्माण करतो, ज्यात सुमारे 50 घरं एका पर्वतावर असून ती स्वत:च्या भिंतींनी सुसज्ज आहेत. येथे मिळालेली दफनभूमी आणि त्यातील थडग्यांमध्ये कुऱ्हाड आणि खंजीर तसेच सुलेमानी दगड मिळाले आहेत. या गोष्टी अपेक्षेपेक्षा अधिक प्रगत समाजाचे संकेत देत असल्याचे चार्लोक्स यांनी म्हटले आहे.