For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिक्षा भरधाव एसटीला धडकली ; नारिंग्रेत 4 जणांचा जागीच मृत्यू

10:15 PM Jun 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
रिक्षा भरधाव एसटीला धडकली   नारिंग्रेत 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement

देवगड / प्रतिनिधी

Advertisement

देवगड तालुक्यातील नारिंग्रे कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना रिक्षेची एसटीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकासह रिक्षेतील चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक संकेत सदानंद घाडी (२९, आचरा देऊळवाडी), संतोष रामजी गावकर (३३, आचरा गाऊडवाडी), सुनिल उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर (४८, आचरा पिरावाडी), रोहन मोहन नाईक (२९, आचरा गाऊडवाडी) यांचा समावेश आहे. तर रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले.हे सर्वजण आचरा येथील रिक्षा व्यावसायिक असून ते वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते. हा अपघात शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच मिठबाव सरपंच तथा रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबाव, नारिंग्रे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अपघातातील मृतदेह विच्छेदनासाठी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या अपघाताची माहिती आचरा गावात पसरताच मोठ्या संख्येने आचरावासीय मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा झाले. मृत व्यक्तींचे नातेवाईकही मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यासह आचरा येथील रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.