किरणोत्सव मार्गातील 4 अडथळे हटविले
देवस्थान समितीच्या पत्रानंतर महापालिकेची कारवाई
कोल्हापूर :
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दक्षिणायणातील किरणोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने किरणोत्सव मार्गात येणारे अडथळे काढण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या वतीने शुक्रवारी 4 इमारतीवरील अडथळे हटविण्यात आले आहेत. यामध्ये इमारतीवरील ग्रील, भिंतीची खिडकी उतरवून घेण्यात आले.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा किरणोत्सव सोहळा वर्षातून दोन वेळा होतो. दक्षिणायणतील किरणोत्सव 9, 10, 11 नोव्हेंबर तर उत्तरायणातील किरणोत्सव सोहळा 31 जानेवारी, 1 व 2 फेब्रुवारी रोजी होतो. यादरम्यान सूर्यनारायणाची मावळतीची किरणे अंबाबाई देवीच्या मूर्तीवर अभिषेक करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मंदिर परिसरात झालेल्या अतिक्रमण आणि टोलेजंग इमारतींमुळे किरणोत्सवामध्ये अडथळे निर्माण होत होते. बुधवार (6 नोव्हेंबर) रोजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने महापालिकेला अडथळे हटविण्या बाबतचे पत्र देण्यात आले. यानुसार महापालिकेकडून शुक्रवारी तत्काळ कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या वतीने शुक्रवारी मंदिर परिसरातील 4 इमारतींवरील अडथळे काढून घेण्यात आले. रोमँटिक दुकानाच्या इमारतीवरील टेरेसचे ग्रील, अनंत वैद्य यांच्या इमारतीवरील अडथळे, रुपम स्टोअर्स यादुकानाच्या इमारतीवरील मागील छत, प्रदीप देशिंगे यांच्या राहत्या घराची खिडकी उतरवून घेण्यात आली.
कारवाईचा दिखाऊपणा
महापालिकेने शुक्रवारी केलेली कारवाई ही केवळ दिखाऊ स्वरुपाची आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने पत्र पाठविल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र यामध्ये जे मुख्य अतिक्रमण स्वरुपात असणारे अडथळे आहेत, ते काढलेले नाहीत. केवळ दिखाऊपणासाठी टेरेसवरील ग्रील, झाडांच्या कुंड्या हटविण्यात आल्याची चर्चा परिसरात होती.