अंमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाई
शेजारील देशातून तस्करी : अनेक कुटुंबाची वाताहत : अनेक आई-वडिलांनी गमावली तरुण मुले
कोल्हापूर / राजेंद्र होळकर :
तरुणाईमध्ये ड्रग्स घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक आई-वडिलांनी आपली तरुण वयातील मुले गमावली आहेत. हे ड्रग्स आपल्या देशात शेजारील पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान येथून येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. याच कारणास्तव गुन्हेगारी देखील वाढत आहे.
ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इत्यादी पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) याचा मादक पदार्थात समावेश आहे. ब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालवर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते.
स्पिरीटचाही नशेसाठी अशाच प्रकारे वापर केला जातो. अति शौकीन लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर करतात. इतकेच नाही तर मॅजिक मश्रूम, एलसीडी, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर यांचाही वापर ड्रग्स म्हणून केला जातो. मात्र गेल्या काही दिवसात सुशांतसिंह रजपूतच्या प्रकरणाने ड्रग्स घेणाऱ्यांची आणि विक्री करणाऱ्यांची झोप उडवली आहे. पण हे ड्रग्स नक्की असतात तरी काय? कोणत्या पद्धतीने ड्रग्स घेतले जातात ?
या देशांतून होतो पुरवठा
शेजारील देशातून म्हणजेच पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, भूतान येथून ड्रग्स आपल्या देशात येतात. याची किंमतही लाखो- करोडो रूपयात असते. याची खरेदी-विक्रीही सांकेतिक भाषेत म्हणजेच खुणांच्या माध्यमातून होते. ‘हशीश’ सारखे अंमली पदार्थ नेपाळमधून पुरवले जातात. नायजेरियामधून भारतात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. नायजेरियन विद्यार्थी वा कपड्यांचे व्यापारी या माध्यमातून ही तस्करी केली जाते.
ड्रग्जचे प्रकार
ड्रग्जचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने हेरॉईन, कोकेन आणि मरिजुआणा या तीन प्रकारांचा समावेश होतो.
हेरॉईन
हेरॉईन हे मॉर्फिनपासून तयार केलेले एक ओपिओइड औषध आहे. जे अफूच्या खसखस वनस्पतीपासून मिळते. हे सामान्यत: पांढरे किंवा तपकिरी पावडर स्वरूपात मिळते. ब्लॅक टार हेरॉईन म्हणून देखील याला ओळखले जाते. हे दिसायला अगदी वितळलेल्या कॅडबरी सारखे असते. हेरॉईन अत्यंत व्यसनाधीन असून याची लवकर लत लागते. याचे सेवन इंजेक्शन, किंवा धूम्रपान स्वरूपात केले जाते. हे आनंद, वेदना आराम आणि विश्रांतीची भावना निर्माण करते. मात्र यामुळे शारीरिक तसेच मानसिक त्रास होतो.
कोकेन
कोकेन हे एक उत्तेजक औषध आहे. जे कोका या वनस्पतीपासून मिळते. हे सहसा पांढऱ्या पावडरच्या स्वरूपात असते. क्रॅक कोकेन म्हणून यास ओळखले जाते. याचे देखील सेवन इंजेक्शन तसेच धुम्रपान स्वरूपात केले जाते. कोकेन मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते. उत्साहाची भावना, ताकत आणि उच्च सतर्कता कोकेन निर्माण करते. अतिप्रमाणात याचे सेवन केल्याने हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी समस्या, पॅरानोईया आणि व्यसन-संबंधित समस्यांसह शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होते.
मारिजुआना
मारिजुआना, ज्याला भांग किंवा गांजा म्हणून देखील ओळखले जाते. हे कॅनॅबिस सॅटिवा वनस्पतीपासून बनविलेले एक औषध आहे. हे विशेषत: धूम्रपान, बाष्पीभवन किंवा खाद्यपदार्थांच्या स्वरूपात घेतले जाते. मारिजुआनामध्ये मन बदलणारे रसायन टीएचसी (टेट्राहाइड्रोकानाबिनॉल) असते. विश्रांती, बदललेली समज आणि भूक वाढवण्याचे काम करते. हेरॉईन किंवा कोकेनच्या तुलनेत हे कमी व्यसनाधीन असले तरी, जास्त किंवा दीर्घकाळापर्यंत याचे सेवन केल्याने स्मृती, आकलनशक्ती आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. या व्यतिरिक्त देखील अनेक नशा करण्यात येतात.
बटन
बटन हे नाव रेल्वे स्टेशन, तसेच झोपडपट्टी इलाख्यात राहणाऱ्या मुलांकडून ऐकण्यात येत आहे. बटन म्हणजेच झोपेची गोळी. याच्या अतिसेवनाने मृत्यू देखील होतो. 16 ते 23 वयोगटातील मुले याचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. बटन व्यतिरिक्त देखील नशेसाठी सुलोचन, फिनेल, खोकल्याचे औषध यांचा सर्रास वापर होतो.