कॅलिफोर्नियातील गोळीबारात 4 ठार
मुलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हाहाकार : 19 जखमी
वृत्तसंस्था/ स्टॉकटन
कॅलिफोर्नियातील स्टॉकटन येथे शनिवारी रात्री एक गोळीबाराची भयानक घटना घडली. मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान ही घटना घडल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसराला वेढा घालत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. तपास यंत्रणा आजूबाजूच्या परिसरातून पुरावे गोळा करून घटनेच्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. सध्या रहिवाशांना कोणत्याही संशयास्पद माहितीची कल्पना पोलिसांना तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे.
कॅलिफोर्नियातील स्टॉकटनमध्ये शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराची माहिती मिळताच एक सुरक्षा पथक घटनास्थळी पोहोचले. गोळीबारात 9 ते 12 वयोगटातील मुलांसह किमान 19 जण जखमी झाले आहेत. 23 वर्षीय एका पुरुषासह अनेक प्रौढ जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी चार जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सॅन जोक्विन काउंटी शेरीफ कार्यालयाने या घटनेत अनेक लोक जखमी झाल्याचेही सांगितले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे जखमींवर उपचार सुरू आहेत. तथापि, जखमींच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांची उपस्थिती आणि रुग्णवाहिका उपस्थित असल्याचे दिसून येत होते. यादरम्यान अनेक रस्ते बंद केल्यामुळे परिसरातील रहिवासी घाबरले आहेत.