पाकिस्तानात स्फोटात 14 ठार, 30 जखमी
क्वेटा येथे सभेनंतर आत्मघाती हल्ला
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या क्वेटा येथे बलुचिस्तान नॅशनल पार्टीची सभा संपल्यानंतर लगेचच आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. मंगळवारी रात्री झालेल्या या स्फोटात 14 जण ठार झाले. तसेच 30 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये माजी खासदार अहमद नवाज आणि पक्षाचे नेते मुसा बलोच यांचाही समावेश आहे. बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री सरदार अताउल्ला मेंगल यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त शाहवानी स्टेडियममध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. सभेनंतर पार्किंगमध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला. तथापि, अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोर दाढी नसलेला होता. तो 35-40 वर्षांचा होता. त्याच्याकडे सुमारे 8-10 किलो स्फोटके असल्याची माहितीही देण्यात आली.