रंकाळा तलावाकाठी 39 राजहंसांचा दिमाखात विहार
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
रंकाळा तलाव काठावरील धोबी घाट येथील काही वर्षापूर्वी कमी झालेली राजहंसांची संख्या वाढत आहे. चार वर्षापूर्वी केवळ 2 राजहंस शिल्लक असताना शांतीदुतचे विजय साळोखे, भारत सुतार, वरेकर मामा यांच्या अथक प्रयत्नातून आता चार पिल्ले व 39 राजहंसांचा तलावात दिमाखात डौलाने विहार सुरू आहे. डौलाने विहार करणाऱ्या राजहंसांमुळे तलावाच्या सौंदर्यात भर पडत आहे. मात्र, त्यांच्या संगोपनाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
रंकाळा येथील घोबी घाट परिसरात अनेक वर्षांपासून पांढरे शुभ्र हंस वास्तव्यास आहेत. परंतु त्यांची संख्या वाढत नव्हती, पैदास वाढत नव्हती. याचा पक्षीप्रेमींनी विचार केल्यानंतर ते सर्व नर हंस असल्याचे आढळले. त्यामुळे रंकाळाप्रेमींनी त्यांच्यासाठी मुंबईहून खास वाहनाने पाच मादी हंस आणून त्यांना 30 नोव्हेंबर 2022 ला तलावात सोडले. त्यानंतर चार महिन्यांनी मादीने अंडी घातली. अज्ञातांकडून त्यांची अंडी पळवण्याचे प्रकार घडल्याने त्यांची संख्या घटत होती. तसेच तलाव परिसरातील इतर प्राणी, पक्षी ही अंडी फस्त करत होते. त्यावर उपाय म्हणून रंकाळाप्रेमींनी तलावाच्या एका बाजूला बेटसदृश जागेवर पत्र्याचे शेड केले. त्या शेडमध्ये प्रथम तीन पिल्लांचा जन्म झाला. त्यानंतर पुढे 11 पिल्ले लहानाची मोठी झाली. रंकाळाप्रेमींच्या दीड वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवीन 39 राजहंस तलावात डौलाने विहार करत आहेत.
राजहंस, बदक हे रंकाळ तलावासाठी लाभदायक आहेत. ते जलपर्णी व शेवाळ खातात, पोहताना सतत पंख फडफडत असल्यामुळे पाण्यात ऑक्सिजन निर्माण होतो. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यास त्यांची मदत होत आहे. त्यांच्या संगोपनासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुल यांनी सांगितले.
- राजहंस गायब करण्याच्या प्रकाराला आळा
मध्यंतरी अज्ञातांकडून 3 राजहंस गायब करण्यात आले होते. एके ठिकाणी मादीने घातलेली अंडीही गायब केली होती. कहर म्हणजे शेडमधील नर राजहंसाला मारून नेण्याचे प्रकारही घडले. याला आळा घालण्यासाठी रंकाळाप्रेमींनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. आता मात्र, याला वचक बसला आहे.
- राजहंस पाळीव पक्षी
वन विभागाच्या 1972 च्या शेड्युल्ड अॅक्टमध्ये त्याचा समावेश होत नसल्याने त्याला कोणत्याही परवानगीची आवश्यकता भासत नाही. मात्र, यांचे संगोपन व्यवस्थित झाले पाहिजे. राजहंस हा पाळीव पक्षी आहे.
जी. गुरूप्रसाद, उपवनसंरक्षक प्रादेशिक, कोल्हापूर
- महापालिकेचे दुर्लक्ष
काही वर्षापूर्वी महापालिकेने रंकाळा परिसरात राजहंस आणून सोडले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची संख्या घटत गेली. रंकाळाप्रेमींच्या प्रयत्नातून राजहंसांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी रोज खाद्य गोळा करावे लागत आहे. रोज त्यांना 6 ते 7 किलो गहू, तांदूळ लागते. साळोखे व त्यांची टिम रोज त्यांच्या खाद्याची व्यवस्था करत आहेत. मात्र काहीवेळा खाद्य कमी पडत आहे. यासाठी पक्षीप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रशासनानेही राजहंसांच्या संगोपनासाठी विशेष तरतूद करण्याची गरज आहे.
विजय साळोखे, खजानीस, लोककल्याण फौंडेशन