रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी थांबणार
कोल्हापूर :
शाम सोसायटी येथील नाल्याचे रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी मत्स्य केंद्रानजीक तात्पुरत्या स्वरुपाचा मातीचा बंधारा घालण्याच्या कामास बुधवारी महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली. येथील सांडपाण्याचा उपसा करुन ते दुधाळी एसटीपी प्रकल्पाकडे वळविण्यासाठी याठिकाणी गुरुवारी मोटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी थांबणार आहे.
रंकाळा तलावात सांडपाणी मिसळत असल्याने तलावातील मासे मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार तीन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. मंगळवारी तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्यासह तलाव परिसरात सुरु विविध विकासकामांची पाहणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत केली. पाहणी दरम्यान आमदार क्षीरसागर यांनी शाम सोसायटी नाला येथून रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी येथे तात्पुरत्या स्वरुपात मातीचा बंधारा घालण्याची सूचना केली. त्यानुसार महापालिका प्रशासनाने बुधवारी येथे मातीचा बंधारा घालण्याच्या कामास सुरुवात केली.