For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

38 वे महिला साहित्य संमेलन उद्या

11:50 AM Feb 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
38 वे महिला साहित्य संमेलन उद्या
Advertisement

मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी-हिंदवाडी महिला मंडळातर्फे आयोजन : दिग्गज साहित्यिक उपस्थित राहणार

Advertisement

बेळगाव : मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी व हिंदवाडी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी वरेरकर नाट्या संघ येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत 38 वे महिला साहित्य संमेलन होणार आहे. अध्यक्ष म्हणून गोव्याच्या पौर्णिमा केरकर तर प्रमुख वक्त्या म्हणून राणी दुर्वे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाध्यक्षांच्या भाषणानंतर दुसऱ्या सत्रात राणी दुर्वे ‘नदी-रुप आणि रुपक’ या विषयावर बोलणार आहेत. त्यानंतर पॉडकास्टर सौमित्र पोटे यांची मुलाखत होणार आहे. चौथ्या सत्रात चित्कला कुलकर्णी यांचे ‘माझा भांडी प्रपंच’ या विषयावर सादरीकरण होणार आहे. त्यांना सहवाचक संतोषकुमार आबाळे यांची साथ लाभणार आहे. वक्त्यांचे परिचय पुढीलप्रमाणे-

संमेलनाध्यक्षा पौर्णिमा केरकर

Advertisement

पौर्णिमा राजेंद्र केरकर गोवा कला अकादमी तसेच मराठी अकादमीच्या सदस्या आहेत. गोवा येथे मराठी विषयाचे अध्यापन त्या करतात. स्पंदन, अनुबंध लोकगंगेचे, धालो या लोकनृत्यावर संशोधनात्मक पुस्तक, ‘विस्मृतीच्या उंबरठ्यावर’ या विषयावर सचित्र पुस्तक ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बा. भ. बोरकर पुरस्कार, पर्यावरण आणि सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठेचा पुरस्कार, साहित्यासाठी पं. महादेव शास्त्राr जोशी पुरस्कार, सिटी रत्न पुरस्कार, ऑर्किड पुरस्कार इत्यादी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. युवा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. कै. श्रीराम पांडुरंग कामत संपादित विश्वचरित्र कोषाच्या सहाव्या खंडासाठी त्यांनी लेखन केले आहे. राज्य तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांचा सहभाग आहे. ‘स्मरूनी गोमंत देवी’ या महानाट्याचे लेखन आणि निर्मिती त्यांनी केली. ‘माझ्या अंगणात सये’ या जात्यावरच्या ओवीबद्ध नाटकाचे लेखन आणि सादरीकरण केले आहे.

सत्र दुसरे, विषय- नदी-रुप आणि रुपक- प्रमुख वक्त्या राणी रवींद्र दुर्वे

राणी दुर्वे या रिझर्व्ह बँकेतून जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाल्या आहेत. बँकेच्या भोपाळ ऑफिसमध्ये असताना रुरल प्लॅनिंग अँड क्रेडिट डिपार्टमेंट या विभागात केलेल्या कामाबद्दल 2014 या वर्षी बँकेने ‘एम्प्लॉई ऑफ द इयर’ हे गोल्ड मेडल देऊन त्यांचा सन्मान केला होता. तत्कालिन गव्हर्नर रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या समारंभात आपल्या भाषणात त्यांच्या कामाचा विशेष उल्लेख केला होता. हे भाषण रघुराम राजन यांच्या ‘आय डू व्हॉट आय डू’ या पुस्तकात समाविष्ट केलेले आहे. राणी दुर्वे या आर्थिक व सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या मराठीतल्या आघाडीच्या ललित लेखिका आहेत. त्यांचे ललित लेखनाचे दोन संग्रह ‘अवघाची शेजार’ आणि ‘लक्ष पावलांचे अर्ध्य’ हे प्रकाशित झालेले आहेत. त्यांचे आणखी एक पुस्तक ‘शब्देविण संवाद’ हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत.

सत्र तिसरे, विषय- माणसं,पॉडकास्ट आणि बरंच काही- प्रमुख पाहुणे सौमित्र पोटे

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, चित्रपट समीक्षक ही सौमित्र पोटे यांची ओळख आहे. संगीत नाट्या आणि साहित्य अभ्यासक सौमित्र पोटे हे त्यांच्या ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलमुळे सर्वांना परिचित आहेत. विविध प्रसार माध्यमातून, वृत्तपत्रातून त्यांनी काम केले आहे. ‘पुस्तकातून’ या नावाने ब्लॉगवर ते करत असलेले लेखन पण वाचकांच्या पसंतीस उतरत आहे. मातृत्वाची मध्यवर्ती संकल्पना ठेवून जुन्या मराठी कवितांच्या ‘आई शोधायचीय’ या कार्यक्रमाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. प्रिंट डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे कौशल्य असलेले सौमित्र पोटे अनेक चित्रपट महोत्सवांना ज्युरी म्हणूनही आमंत्रित केले जातात.

सत्र चौथे, विषय- माझा भांडी प्रपंच- सादरकर्त्या चित्कला कुलकर्णी, इचलकरंजी

चित्कला कुलकर्णी या इचलकरंजीच्या असून त्या बीए, बीएड आहेत. ‘माझे वृक्ष माझी माऊली’, ‘संत साहित्यातील पक्षी’ इत्यादी विषयांवर व्याख्याने. त्यांच्या ‘माझा भांडी प्रपंच’ या संहितेला आणि अभिवाचनाला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले. ‘माझ्या हिरवाईचा परिमळु’ आणि ‘माझा भांडी प्रपंच’ ही पुस्तके प्रकाशित आणि या दोन्ही पुस्तकांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे यांचे पारितोषिक मिळालेले आहे. लेखन,वाचनाबरोबरच त्या पर्यावरणाची कामे पण करतात. अनेक जखमी पक्ष्यांवर उपचार करून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडून ‘पक्षी मैत्रीण’ म्हणून काम करतात. आजवर त्यांनी हजारहून अधिक दुर्मीळ वृक्ष लागवड करून त्यांचे जतन केले आहे.

सहवाचक संतोषकुमार आबाळे

संतोषकुमार आबाळे हे इचलकरंजीचे असून गेली पंधरा वर्षे ते रंगभूमीवर कार्यरत आहेत. अनेक नाटके, शॉर्ट फिल्म्स, वेबसिरिज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. राज्य नाट्या स्पर्धेमध्ये सलग दोन वेळा रौप्यपदक, 2017 चा शाहू गौरव पुरस्कार, एकांकिका स्पर्धा आणि महाराष्ट्रातील अनेक अभिवाचन स्पर्धांमधून त्यांनी वैयक्तिक बक्षिसे मिळवलेली आहेत. ‘मनोरंजन करंडक’ इचलकरंजी या एकांकिका स्पर्धेचे पंधरा वर्षे स्पर्धा प्रमुख, अ. भा. मराठी नाट्या परिषद, इचलकरंजी शाखेचे कार्यवाह, मसाप इचलकरंजी शाखेचे संचालक आणि मनोरंजन मंडळ इचलकरंजीचे सहकार्यवाह म्हणून ते काम पाहतात. संमेलन  सर्वांसाठी खुले असल्याचे कळविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.