खरीप पिकांची 38 टक्के पेरणी; जोरदार पावसाअभावी भात रोपांची लावण खोळंबली
संरक्षित पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी रोप लावण सुरु; पेरणी झालेल्या पिकांची उगवण; उगवण झालेल्या पिकांमध्ये अंतरमशागतीच्या कामांना वेग
कोल्हापूर प्रतिनिधी
यंदाच्या खरीप हंगामात पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 92 हजार 633 हेक्टर आहे. आजतागायत 70 हजार 738 हेक्टर (38 टक्के) क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. यामध्ये भात, ख. ज्वारी, भुईमूग, नागली, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. जिह्याच्या पूर्वेकडील तालुक्यात पेरणी लायक पाऊस झाला नसल्यामुळे मशागतीची कामे पूर्ण झालेली नाहीत. यंदा पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे पेरण्यांना उशीर झाला असून चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. काही तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिरायती क्षेत्रातील पेरण्या व भात रोप लावणी खोळंबल्या आहेत.
कोल्हापूर जिह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1971.6 मि.मी एवढे असून माहे मे महिन्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान 51.5 मी.मी होते मे अखेर 37.3 मी.मी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. माहे जून 2023 चे सरासरी पर्जन्यमान 362.9 मी.मी इतके असून माहे जून 2023 अखेर 72.2 मी.मी ( 19.9 टक्के इतक्या मिमी पावसाची नोंद झालेली आहे. माहे जुलै 2023 चे सरासरी पर्जन्यमान 685.5 मी.मी इतके असून 9 जुलैअखेर 18.1 टक्के पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षेप्रमाणे अद्याप पाऊस सुरु झालेला नाही. गतवर्षातील खरीप हंगामाचा विचार करता 9 जुलै 2022 अखेर 158.8 मी.मी ( 23 टक्के) पाऊस झाला होता. प्रमुख पिकांची 1.26,028 हेक्टर (69.71 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामध्ये भात 61997 , नागली 2571, भुईमूग 2624, सोयाबीन 32430 तर 999 हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकाची पेरणी झालेली होती.
भात पिकाची 40 टक्के पेरणी
भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 92320 हेक्टर इतके आहे. चालू हंगामात नजर अंदाजित भात 37500 हेक्टर (40.62 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. भात रोप लावणीसाठी 4500 हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यात आलेल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोपलागणीची कामे खोळंबली आहेत. चांगला पाऊस झाल्यास रोपलागणीस वेग येणार आहे. पेरणी झालेले भात पिकाची उगवण चांगली झाली आहे. नाचणी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 17100 हे. इतके आहे. 9 जुलै अखेर केवळ 836 हेक्टर (4.89 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रोप लागणीसाठी रोपवाटिका तयार करण्यात आलेल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोपलागणीची कामे खोळंबली आहेत. खरीप ज्वारी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 937 हेक्टर आहे. 9 जुलैअखेर केवळ 300 हेक्टर (32.02 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
सोयाबीनची 50 टक्के पेरणी
सोयाबीन सोयाबीन पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 42274 हे. इतके आहे. आजतागायत 17586 हेक्टर (49.60 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सोयाबीन पिकाखालील मोठ्या प्रमाणात क्षेत्र आलेल्या हातकणंगले शिरोळ कागल करवीर व गडहिंग्लज तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. शेतकरी जारेदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भुईमूग पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 35312 हे इतके आहे. पण केवळ 39.62 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. भात पिकाची पेरणी झालेल्या क्षेत्रावरील उगवण होत आहे. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी पाणी देण्यात येत होते. सुविधा नसलेल्या क्षेत्रावरील उगवण झालेले पीक करपून जाण्याची शक्यता होती. परंतू पावसाला सुरवात झाल्यामुळे दुबार पेरणीची शक्यता नाही. तूर, मूग उडीद व इतर कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र 3790 हेक्टर आहे. आजतागायत केवळ 15 टक्के पेरणी झाली आहे.