दिवाळीतून परिवहनला 38 लाखांचा महसूल
आर्थिकदृष्ट्या समाधान : विविध मार्गांवर धावल्या जादा बस
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळी काळात सोडलेल्या अतिरिक्त बससेवेतून परिवहनला 38 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या परिवहनला काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
विशेषत: बेंगळूर, मुंबई, पुणे आणि गोवा मार्गांवर 78 जादा बस सोडण्यात आल्या होत्या. दिवाळी काळात मूळ गावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्याचबरोबर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही दुपटीने वाढलेली असते. यासाठी परिवहनने जादा बसेसची व्यवस्था केली होती. दिवाळी काळात अतिरिक्त 78 बस 76,850 कि. मी. धावल्या आहेत. विशेषत: शक्ती योजनेमुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मात्र, केवळ राज्यातच शक्ती योजनेचा लाभ मिळू शकतो. परराज्यात महिला प्रवाशांना तिकीट आकारणी केली जाते.
दिवाळी काळात रात्रीच्या प्रवासासाठी धावणाऱ्या वातानुकूलित बससेवेलाही उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर परिवहनने आगाऊ बुकिंग सेवाही उपलब्ध केली होती. याचादेखील प्रवाशांनी लाभ घेतला. मुंबई, पुणे, बेंगळूर मार्गांवर अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या मार्गांवर प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीतून अधिक उत्पन्न मिळाले आहे.