37 वर्षे काढली तुरुंगात, आता 116 कोटीची भरपाई
एका व्यक्तीला बलात्कार आणि हत्येप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली होती. प्रत्यक्षात त्याने हा गुन्हाच केला नव्हता. 1983 झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरविण्यात आले होते. अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील हे प्रकरण असून रॉबर्ट डुबोइसला शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु आता रॉबर्टने हा गुन्हा केलाच नव्हता असे समोर आले आहे. यामुळे सरकार भरपाईदाखल त्याला सुमारे 116 कोटी रुपये देणार आहे.
टंपा शहरातील हे प्रकरण आहे. वयाच्या 18 व्या वर्षी रॉबर्टला प्रथम मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. त्याच्यावर 19 वर्षीय बार्बरा ग्राम्सच्या हत्येचा आरोप होता. नंतर त्याची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती. रॉबर्टचे सध्या वय 59 वर्षे आहे. एका डीएनए चाचणीत बार्बराच्या बलात्कार आणि हत्येत अन्य दोन गुन्हेगार सामील होते असे स्पष्ट झाले, यामुळे रॉबर्टची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे.
यानंतर रॉबर्टने याप्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आणि एक फॉरेन्सिक दंत चिकित्सकाच्या विरोधात खटला दाखल केला होता. पीडितेच्या शरीरावर असलेल्या चावण्याची खुण रॉबर्टच्या दातांच्या रचनेशी जुळत असल्याचे दंत चिकित्सकाने म्हटले होते. परंतु तेव्हा 1980 च्या दशकात डीएनए चाचणीची सुविधा उपलब्ध नव्हती. ऑगस्ट 1983 मध्ये बार्बरा नाव असलेल्या युवतीवर बलात्कार झाला होता, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. ती टंपा येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम केल्यावर स्वत:च्या घरी जात असताना हा गुन्हा घडला होता.
बार्बराच्या शरीरावर मिळालेल्या खुणांचा शोध लावण्यासाठी अनेक पुरुषांचे बाइट सॅम्पल ध्घेण्यात आले हेते, ज्यात रॉबर्टचा समावेश होता. प्रत्यक्षात हे वॅक्स म्हणजेच मेणामुळे तयार झालेली खुण होती असे आता स्पष्ट झाले आहे. तर फोरेन्सिक दंत चिकित्सकाने हे रॉबर्ट चावल्यामुळे निर्माण झाल्याचा दावा केला होता. परंतु आता सत्य समोर आल्याने रॉबर्ट यांना भरभक्कम भरपाई मिळणार आहे, पण त्यांनी तुरुंगात काढलेली 37 वर्षे त्यांना परत मिळणार नाहीत.