टेम्पो उलटून 36 मनरेगा कामगार जखमी
हिडकल डॅमकडे जाताना बुलेटचालकाला चुकवताना अपघात : दुचाकी चालकाचा मृत्यू
बेळगाव : मनरेगा योजनेच्या कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो उलटून 36 जण जखमी झाले. तर दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी हुक्केरी तालुक्यातील होसूरजवळ ही घटना घडली असून यापैकी 30 जणांवर सिव्हिलमध्ये तर 6 जणांवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. यमकनमर्डीहून हिडकल डॅमकडे जाताना होसूरजवळ ही घटना घडली असून समोरून येणाऱ्या बुलेटला चुकविण्याच्या प्रयत्नात टेम्पो उलटली आहे. घटनेची माहिती समजताच यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले.
टेम्पोचालकाने बुलेटला चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुलेटला टेम्पोची धडक बसली. या अपघातानंतर टेम्पो उलटली. दुपारी क्रेनच्या साहाय्याने टेम्पो उचलण्यात आला. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असून 25 हून अधिक जण किरकोळ जखमी आहेत. तर हातापायांना गंभीर दुखापत झालेल्यांवरही खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. आवाक्का पराप्पा तेली (वय 52), शांतव्वा दुंडाप्पा तेली (वय 48), सुनिता मारुती कोळी (वय 40), कस्तुरी निंगाप्पा कम्मार (वय 55), रायाप्पा ताताप्पा मगदूम (वय 68) अशी काही जखमींची नावे आहेत. या अपघातात बुलेट चालक अडव्याप्पा बसवाणी अंकलगी (वय 42 रा. आवरगोळ, ता. हुक्केरी) याचा गोकाक इस्पितळात उपचार घेताना मृत्यू झाला आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.