भीषण बस दुर्घटनेत उत्तराखंडमध्ये 36 ठार
बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली : वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात, 6 जण गंभीर
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडमधील अल्मोडा येथे प्रवासी बस 150 फूट खोल दरीत कोसळल्यामुळे घडलेल्या भीषण दुर्घटनेत 36 प्रवाशांना प्राणास मुकावे लागले. तसेच 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे. तर दोन जखमींना एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आले आहे. अन्य प्रकाही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक इस्पितळात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी 8 वाजता हा अपघात घडला. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
अल्मोडा जिल्ह्यातील सॉल्ट डेव्हलपमेंट ब्लॉकमधील कुपी भागात बसला अपघात होऊन ती खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या 36 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दहा महिलांचा समावेश आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री धामी यांनी कुमाऊं विभागाच्या आयुक्तांना या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघाताची चौकशी करण्यासाठी परिवहन मुख्यालयाने तपास पथक तयार केले आहे. 42 प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमधून 50 हून अधिक जण प्रवास करत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
अपघातग्रस्त बस नैनीदांडा येथील किनाथ येथून रामनगरकडे जात होती. बस मार्चुला येथे येताच सरद बंदजवळ एका अवघड वळणावरील कठड्याला धडक देत दरीत कोसळून नदीपात्रात विसावली. बस नदीत पडल्याने प्रवाशांनी आरडाओरड करत स्वत:च्या बचावासाठी प्रयत्न केले. मात्र, काही लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर काही लोक बसमधून बाहेर फेकले गेल्याने बचावले. जखमी लोकांनी अपघाताबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य केले. दुर्घटनाग्रस्त बसमध्ये 55 हून अधिक प्रवासी होते.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पौरी आणि अल्मोडा या संबंधित भागात एआरटीओ अंमलबजावणी निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही दखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्मोडा येथील रस्ता अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तराखंडमधील अल्मोडा येथे झालेल्या रस्ते अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदत आणि बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र सरकारकडूनही त्यांना सहकार्य केले जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.