चीनमध्ये पूर-भूस्खलनामुळे 34 जणांचा मृत्यू
80 हजार लोकांना वाचविण्यास यश
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनची राजधानी बीजिंग आणि आसपासच्या भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे आतापर्यंत 34 जणांना जीव गमवावा लागला आहे. बीजिंगच्या मियुन जिल्ह्यात 28 तर यानछिंग जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही भाग शहराच्या बर्हिगत हिस्स्यांमध्ये स्थित आहेत.पूरामुळे बीजिंगमधून 80 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहेत. यातील सुमारे 17 हजार लोक मियुन जिल्ह्यातील आहेत. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बीजिंगच्या काही हिस्स्यांमध्ये मंगळवारी सकाळी पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. 
बीजिंगला लागून असलेल्या हपेई प्रांताच्या लुआनपिंग काउंटीत सोमवारी भूस्खलन झाले. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण बेपत्ता झाले आहेत. या भागातील मोबाइल नेटवर्क बंद झाल्याने संपर्क साधणे अवघड ठरल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले आहे.
बीजिंग प्रशासनाने सोमवारी रात्री 8 वाजता उच्चस्तरीय आपत्कालीन प्रतिसाद जारी केला, याच्या अंतर्गत सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. निर्मितीकार्य आणि अन्य कार्यांवर बंदी घालण्यात आली आहे. चीन सरकारने हपेई प्रांताला 50 दशलक्ष युआनची तातडीची मदतसामग्री पाठविण्यात आली आहे. तसेच चेंगदे, बाओडिंग, झांगजियाकौ यासारख्या प्रभावित शहरांमध्ये मदतकार्यासाठी पथकांना रवाना करण्यात आले आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पूरात बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्याचा आणि बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्याच आदेश दिला आहे.