चक्रीवादळाच्या तडाख्यात अमेरिकेत 34 ठार
आठ राज्यांमध्ये मोठे नुकसान : 10 कोटी लोक प्रभावित
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील अलाबामा, मिसिसिपी, लुईझियाना, इंडियाना, अर्कांसस, मिसूरी, इलिनॉय आणि टेनेसी या राज्यांना चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. गेल्या दोन दिवसात या राज्यांमध्ये 34 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 10 कोटी अमेरिकन लोकसंख्येवर याचा परिणाम झाला आहे. तसेच झाडे कोसळणे आणि इतर आपत्तींमुळे विद्युत पुरवठा कोलमडला असून 2 लाख घरांमधील बत्ती गुल झाली आहे. अजूनही येथील नैसर्गिक आपत्ती शमलेली नसून हवामान खात्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली आहे.
जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. मिसूरीमध्ये सर्वाधिक 12 जणांचा मृत्यू झाला आहे. धुळीच्या वादळामुळे महामार्गावर सुमारे 50 वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. मिसिसिपीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण बेपत्ता झाले. 100 किमी/तास वेगाने धुळीचे वादळ वाहत आहे. अर्कांससमध्ये 265 किमी/तास वादळाचा वेग नोंदवण्यात आला. यात इमारती आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. रविवारी अनेक राज्यांमध्ये बेसबॉलच्या आकाराच्या गारा कोसळल्या. राष्ट्रीय हवामान सेवेने दक्षिण डकोटा आणि पश्चिम मिनेसोटाच्या काही भागांसाठी हिमवादळाचा इशारा जारी केला आहे. या भागात 6 इंचांपर्यंत बर्फवृष्टीची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा वेग वाढण्याचा इशारा
वेगाने वाहणारे वादळ गंभीर धोका निर्माण करू शकते, असा दावा अमेरिकेतील वादळ अंदाज केंद्राने केला आहे. पूर्व लुईझियाना, मिसिसिपी, अलाबामा, पश्चिम जॉर्जिया आणि फ्लोरिडामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. टेक्सास, कॅन्सस, मिसूरी आणि न्यू मेक्सिको येथे जंगलातील आगींचा धोका वाढला आहे.