3,300 रु. ऊस दराविषयी सरकारचा अधिकृत आदेश जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी ऊस दरावरून पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने प्रति टन 3,300 रुपये दर देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला होता. शनिवारी याबाबतचा अधिकृत आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा 100 रुपये अधिक देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता 2025-26 सालातील हंगामात 11.25 रिकव्हरी असलेल्या उसाला प्रतिटन 3,200 रुपये अधिक 100 रुपये असे मिळून 3,300 रु. दर देण्यात येत असल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 10.25 रिकव्हरी आल्यास अतिरिक्त 100 रुपयांसह 3,200 रु. दिला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. अतिरिक्त 100 रुपयांमध्ये साखर कारखानदारांकडून 50 रु. आणि राज्य सरकारकडून 50 रु. योगदान दिले जाणार आहे. उसाला प्रति टन 3,500 रुपये दर देण्याची मागणी करून शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. याची दखल घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी शेतकरी नेते आणि साखर कारखानदारांची स्वतंत्र बैठक घेत ऊस दरावर तोडगा काढला होता.
साखर कारखानदारांच्या उपस्थितीत दरावर निर्णय
उसाला प्रति टन 3,300 रु. दर देण्याचा निर्णय साखर कारखाना मालकांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. जून महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेला 3,200 रु. दर कारखानदारांनी मान्य केला नव्हता. नंतर संमती दर्शविली. आता कारखानदारांनी 50 रु. अतिरिक्त द्यावेत. सरकार 50 रु. प्रोत्साहनधन देईल.
- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री