शिबिरासाठी 33 हॉकीपटूंची निवड
वृत्तसंस्था /बेंगळूर
हॉकी इंडियाने सोमवारी वरिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी 33 सदस्यीय संभाव्य खेळाडूंची घोषणा केली. हे शिबिर 29 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान बेंगळूर येथील स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एसएआय) सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहे. हॉकी इंडियाच्या प्रेस रिलीजनुसार, आगामी दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी 31 वा सुलतान अझलन शाह कप 22 ते 29 नोव्हेंबर दरम्यान मलेशियातील इपोह येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौऱ्याच्या तयारीकरीता भारतीय संघासाठी हे शिबीर एक महत्त्वाचा टप्पा राहणार आहे.
राजगीर येथे झालेल्या पुरूष हॉकी आशिया कप 2025 मध्ये अपराजित राहिल्यानंतर भारतीय खेळाडू या शिबिरात उतरले आहेत. जिथे त्यांनी ट्रॉफी जिंकली आणि एफआयएच हॉकी पुरूष विश्वचषक 2026 साठी थेट स्थान मिळवले. आत्मविश्वास उंचावलेला असल्याने आता विजयाची गती कायम राखणे, महत्त्वाच्या विभागात सुधारणा करणे आणि सर्व विभागांमध्ये अधिक खोली निर्माण करणे यावर शिबिरात लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
शिबिरापूर्वी बोलताना भारतीय पुरूष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, आशिया कप जिंकणे आणि विश्वचषक पात्रता मिळवणे हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. परंतु ही फक्त सुरूवात आहे. खेळाडू नवीन उमेदीने शिबिरात परतले आहेत आणि आता आमचे लक्ष सुलतान अझलन शाह स्पर्धेसाठी रणनितीक तयारी करण्यावर पूर्णपणे केंद्रीत आहे. विश्वचषक तयारी सुरू करण्यासाठी आणि आमच्या मोठ्या ध्येयांकडे वाटचाल सुरू ठेवण्यासाठी थेट दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी ही आणखी एक मौल्यवान परीक्षा असेल. यश केवळ निकालांबद्दल नाही ते आपण एक संघ म्हणून कसे शिकत राहतो, जुळवून घेतो आणि एकत्र कसे वाढत राहतो याबद्दल आहे.
वरिष्ठ पुरूषांच्या शिबिरासाठी निवडलेले 33 खेळाडू
कृष्ण बी. पाठक (गोलकिपर), सुरज करकेरा, पवन, मोहीत होन्नेहळ्ळी, शशिकुमार, डिफेंडर -संजय, जुगराज सिंग, हरमनप्रित सिंग, अमित रोहीदास, सुमित, निलम संजीप, जरमनप्रीत सिंग, पूवण्णा चंदुरा बॉबी, यशदीप सिवाच, अमनदीप लाकरा, वरुण कुमार, मिडफिल्डर्स- राजिंदर सिंग, राजकुमार पाल, हार्दीक सिंग, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग, मोइरंगथेम रविंचंद्र सिंग, विष्णू कांत सिंग, नीलकांता शर्मा, मोहम्मद राहील मौसीन, मनिंदर सिंग, फॉरवर्ड्स-अभिषेक, सुखजीत सिंग, सेल्वम कार्ती, शिलानंद लाक्रा, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अंगद बीर सिंग, आदित्य अर्जुन लालगे.