वेर्णात 33 कार जळून खाक
स्कॉडाच्या 22 तर रेनॉल्टच्या 11 कारचा समावेश : सुक्या गवताला लागलेल्या आगीमुळे दुर्घटना,प्राथमिक अंदाजाने नुकसानी कोटांच्या घरात, गोव्यातील पहिलीच घटना
मडगाव : वेर्णा औद्योगिक वसाहतीत काल मंगळवारी संध्याकाळी 3.30 वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीत एकूण 33 कार जळून खाक झाल्या. यात स्कॉडाच्या 22 तर रेनॉल्टच्या 11 कारचा समावेश आहे. त्यात रेनॉल्टच्या एका डेमो कारचाही समावेश आहे. सुक्या गवताला लागलेली आग सर्व्हिस सेंटरच्या बाहेर पार्क केलेल्या कारपर्यंत पोचली आणि एका रांगेत पार्क केलेल्या या सर्व कारनी पेट घेतला. दुपारची वेळ असल्याने आग प्रचंड भडकली आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोचण्यापूर्वीच सर्व कार जळून भस्मसात झाल्या. गोव्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली.
स्कॉडा व रेनॉल्ट कार सर्व्हिसिंग करण्याचे सेंटर एकाच इमारतीत असून जळून खाक झालेल्या कारपैकी बऱ्याच कारचे सर्व्हिसिंग करून मालकांकडे सुपूर्द करण्यासाठी त्या सेंटरच्या बाहेर पार्क केल्या होत्या. काही कारचे सर्व्हिसिंग करण्याचे बाकी होते. यात अपघातात सापडलेल्या व दुरूस्तीसाठी आणून ठेवलेल्या कारचा समावेश होता. या सर्व्हिस सेंटरच्या परिसरात सुकलेल्या गवताला आग लागली होती. ही आग भडकली आणि ती कार पार्क केलेल्या ठिकाणी पोचली आणि कारनी पेट घेतला. एकापाठोपाठ तब्बल 33 कार जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाला दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी वेर्णा औद्योगिक वसाहतीत गवताला लागलेली आग विझविण्यासाठी संपर्क करण्यात आला.
टायर, सीटमुळे आग अधिक भडकली
कारचे टायर व सीटमुळे आग अधिक भडकली अशी माहिती अग्निशामक दलाचे विभागीय अधिकारी फ्रान्सिस्को मेनन यांनी दिली. आग विझविण्यासाठी सुरवातीला वेर्णा नंतर वास्को, मडगाव व फोंडा येथून अग्निशामक दलाचे बंब पाचारण करण्यात आले. टायरला आग लागली की, त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व्हिसिंग सेंटरच्या जनरेटरच्या युनिट व पेटींग बुथपर्यंत ही आग पोचल्याने हानी झाली. आगीवर नियंत्रण मिळविल्याने सर्व्हिस सेंटरच्या आतमध्ये पोचली नाही अशी माहिती मेनन यांनी दिली. आगीत भस्मसात झालेल्या कार जर काही अंतर सोडून पार्क केल्या असत्या तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती, अशी माहिती देण्यात आली. एका रांगेत कार पार्क करण्यात आल्याने एका कारने पेट घेतल्यानतंर ही आग दुसऱ्या गाडीपर्यंत पोचली असे करत सर्व कार जळून खाक झाल्या.
वुडबॉर्नच्या कर्मचाऱ्यांची धावपळ
या सर्व्हिस सेंटरच्या जवळ असलेल्या वुडबॉर्न फर्निचर या आस्थापनाच्या मालकाच्या मुलाने सर्वात अगोदर ही आगीची घटना पाहिली व त्याने सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्यांना कल्पना दिली. पण, त्यांनी धावपळ करून कार गाड्या बाजूला काढण्यासाठी किंवा आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही. उलट आपल्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करून आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांनाही ते शक्य झाले नसल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षीही गवताला लागली होती आग
या सर्व्हिस सेंटरच्या परिसरात गेल्या वर्षीही सुक्या गवताला आग लागली होती. त्यावेळी आपल्याच कर्मचाऱ्यांनी पाणी वापरून आग विझविली होती. त्यामुळे गेल्यावर्षी दुर्घटना टळली होती. मात्र, यावेळी गवताला लागलेली आग कारपर्यंत पोचली व कार जळून गेल्याचे त्यांनी सांगितले. वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आग कशामुळे लागली याचा तपास सुरू केला होता. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेजवरून माहिती मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. गवताला कुणी आग लावली की थेट कारना आग लावली याचा तपास वेर्णा पोलिस करीत आहेत.