लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक
बेळगाव : लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्या सामाजिक बांधिलकी (सीएसआर) उपक्रमांतर्गत लोककल्प फौंडेशनने खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेतली आहेत. स्थापनेपासून या गावात ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या देण्याचा प्रयत्न लोककल्पने केला आहे. अलीकडेच लोकमान्य फौंडेशनने खानापूर तालुक्यातील चिगुळे या गावामध्ये मुलांसाठी बाक, शुद्ध पाण्याचे उपकरण, थंडीपासून संरक्षण म्हणून स्वेटर आदी साहित्य दिले आहे. तसेच क्रीडा साहित्य, ग्रीन बोर्ड अशा विविध मूलभूत गोष्टी हे फौंडेशन पुरवत आहे. याशिवाय गावातील नागरिकांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जाते. याबद्दल चिगुळे शाळेचे मुख्याध्यापक राहुल भंडारी यांनी लोककल्पला धन्यवाद दिले आहेत. आपल्या पत्रात ते म्हणतात खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा व चिंता विसरावयास लावून मनाला विरंगुळा देण्याचे, शरीर व मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करू शकतात. लोककल्पने क्रीडा साहित्य दिल्याने मुलांना त्याचा निश्चितच उपयोग होत आहे. या मदतीबद्दल आम्ही सर्व शिक्षक लोककल्पचे ऋणी आहोत. आपल्या विश्वासाला पात्र ठरत आम्ही विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक घडविण्याचा नक्की प्रयत्न करू.