मंगळवारी 32 भटक्या कुत्र्यांचे लसीकरण
बेळगाव : महानगरपालिका आणि पशुसंगोपन खात्याच्यावतीने मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी शहरात 32 भटक्या कुत्र्यांना अँटिरॅबीज लस टोचण्यात आली. कंग्राळ गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, जिल्हा पंचायत कार्यालय परिसरात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना पकडून लसीकरण करण्यात आले. सदर मोहीम महिनाभर विविध ठिकाणी राबविली जाणार आहे. 28 सप्टेंबर या जागतिक रॅबीज दिनानिमित्त महानगरपालिका आणि पशुसंगोपन खात्याकडून शहर व उपनगरातील भटक्या कुत्र्यांना अँटिरॅबीज लस टोचली जात आहे. दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली असून कुत्र्यांच्या कळपाकडून नागरिकांवर होणार हल्लेदेखील वाढले आहेत. त्यामुळे बेळगावकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कुत्र्यांची वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. यंदा भटक्या कुत्र्यांना अँटिरॅबीज लस टोचण्यात यावी, असा प्रस्ताव पशुसंगोपन खात्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार सोमवारपासून लसीकरण मोहिमेला चालना देण्यात आली. सोमवारी पहिल्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात 28 भटक्या कुत्र्यांना लस टोचण्यात आली. तर मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कंग्राळी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली व जिल्हा पंचायत कार्यालय परिसरात फिरणाऱ्या 32 कुत्र्यांना पकडून त्यांचे लसीकरण करण्यात आले.