For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रान्स्पोर्ट कंपनीला तब्बल 32 लाखांचा चुना

11:37 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रान्स्पोर्ट कंपनीला तब्बल 32 लाखांचा चुना
Advertisement

विविध ब्रँचमधील परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा सहभाग : तिघांच्या मुसक्या आवळल्या, दोघे अद्याप फरार

Advertisement

बेळगाव : कंपनीच्या व्यवहारातून आलेले पैसे कंपनीच्या खात्यात न भरता स्वत:च्या खात्यात जमा करून ऑटोनगर येथील एका ट्रान्स्पोर्ट कंपनीला 32 लाखांना गंडविण्यात आले आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला असून उत्तरप्रदेश व बिहारमधील तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. फसवणुकीच्या या प्रकाराने खासगी कंपनी चालकात खळबळ माजली आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी व शिवाजी चव्हाण आदींचा समावेश असलेल्या पथकाने उत्तरप्रदेश व बिहारला जाऊन तिघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रदीप रामदुलारे सिंग (वय 30) रा, केम्पूर, मोहम्मदाबाद, जि. महू, उत्तरप्रदेश, संजयकुमार श्रीयुत यादव (वय 43) रा. बावराबुदाम, पोस्ट गौरी, जि. गाजीपूर, उत्तरप्रदेश, कमलेश योगेंद्र ठाकुर (वय 49) रा. सनापूर, जि. दरभंगा, बिहार अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

ऑटोनगर येथील टीसीआय (ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) या कंपनीला त्याच कंपनीतील कामगारांनी 32 लाख 8 हजार 858 रुपयांना ठकविले आहे. यासंबंधी कंपनीच्या बेंगळूर कार्यालयातील लवकेशकुमार लक्ष्मीनारायणस्वामी साहू यांनी 4 एप्रिल 2024 रोजी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. सध्या अटकेत असलेला प्रदीप हा कॅशियर म्हणून काम करीत होता. तर कमलेश कंट्रोलर ऑफिसर होता. 22 एप्रिल 2022 पासून 31 डिसेंबर 2023 या काळात कंपनीच्या व्यवहारातून आलेली रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतली आहे. याकामी बेळगाव येथील कार्यालयात काम करणारा त्यांचा सहकारी संजयकुमार, होस्पेट ब्रँचचा कर्मचारी सौरभ नरेंद्र मिश्रा, गुलबर्गा ब्रँचमध्ये काम करणारा देवेंद्र दलबीर यांचीही मदत लागली आहे. सध्या सौरभ व देवेंद्र हे दोघे फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. टीसीआय कंपनीत काम करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध भादंवि 406, 409, 420, सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकुटाने कंपनीला फसवल्याची कबुली दिली असून फरारी आरोपींना अटक केल्यानंतर याप्रकरणी आणखी माहिती उजेडात येणार आहे. त्या दोघा जणांना अटक करण्यासाठी पोलीस पथक कार्यरत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.