For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

313 संवेदनशील-अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची जिल्ह्यात नोंद

10:22 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
313 संवेदनशील अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची जिल्ह्यात नोंद

सीसीटीव्ही, सशस्त्र दलाची नियुक्ती करण्याचे नियोजन

Advertisement

बेळगाव : लोकसभेच्या निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी केली जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासन हाय अलर्ट झाले असून, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदार केंद्रांची नोंद घेऊन त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना राबविण्यावर भर दिला आहे. या मतदान केंदांवर सीसीटीव्हीची नजर ठेवण्यासाठी तयारी केली आहे. 16 विधानसभा मतदारसंघांमध्ये 313 संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदार केंद्रांची नोंद केली आहे. मतदान काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कोणत्याच प्रकारच्या अनुचित घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. तर विविध पथकांची नियुक्तीही केली आहे. मतदार संघांमध्ये संवेदनशील मतदान केंद्रांच्या व्याप्तीमध्ये पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन करून नागरिकांमध्ये निर्भयपणे मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या व आमीष दाखवून मतदान करण्यास भाग पाडणाऱ्या कृतींवर निर्बंध घालण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

निर्भय व मुक्त वातावरणात मतदान व्हावे यासाठी जनजागृती केली जात आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांच्या व्याप्तीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून जागृती करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या 16 विधानसभा मतदारसंघामध्ये 313 संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची नोंद घेतली आहे. अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. उमेदवार निश्चित होऊन प्रचारानंतर या मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षा व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात येत आहे.  बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीतील बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघात 17, बेळगाव द. 4, गोकाक 30, अरभावी व रामदुर्गमध्ये प्रत्येकी 23, बैलहौंगल 9, सौंदत्ती 8, बेळगाव ग्रामीण 32 मतदान केंद्रांची संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्र म्हणून नोंद घेतली आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कुडची विधानसभा मतदारसंघात 21, रायबाग 28, हुक्केरी 21, अथणी 22, कागवाड 7, निपाणी 29, यमकनमर्डी 9, चिकोडी-सदलगा 30 या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संवेदनशील व अतिसंवेदनशील नोंद घेतली आहे.

Advertisement

सशस्त्र दलाची नियुक्ती करणार

जिल्ह्यामध्ये शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कडक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदार केंद्रांची नोंद घेऊन सदर मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही  व आवश्यक ठिकाणी केंद्रीय सशस्त्र दलाची नियुक्ती केली जाणार आहे.

- जिल्हा निवडणूक अधिकारी, नितेश पाटील

Advertisement
Advertisement
Tags :
×

.