31 नक्षलींचा खात्मा, दोन जवान हुतात्मा
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर चकमक : बिजापूरमधील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातून शस्त्रास्त्रे-दारुगोळाही जप्त
वृत्तसंस्था/ बिजापूर
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर रविवारी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी 31 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. सर्व 31 जणांचे मृतदेह हस्तगत करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. ही चकमक बिजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात घडली. त्यानंतर दिवसभर शोधमोहीम सुरू होती. चकमकीदरम्यान जखमी झालेल्या सुरक्षा जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोन सैनिकांना उपचारादरम्यान हौतात्म्य प्राप्त झाले. तर इतर दोघांवर उपचार सुरू असल्याचे बस्तर विभागाचे आयजी पी. सुंदरराज यांनी सांगितले.

त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या अगदी आधी बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. बिजापूरच्या सीमेवर रविवारी पहाटे 1000 हून अधिक सैनिकांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम चालवली. नक्षलवाद्यांच्या वास्तव्याविषयी गुप्तचर विभागाकडून माहिती मिळताच सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक घटनास्थळी पोहोचले. कारवाईच्या भीतीने नक्षलवाद्यांच्या बाजूने गोळीबार सुरू झाला. त्यानंतर सुरक्षा दलाने रोखठोक प्रत्युत्तर दिल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षात नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चकमकीदरम्यान जखमी सैनिकांना बाहेर काढण्यासाठी जगदलपूरहून एमआय-17 हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले होते. बस्तर विभागाचे आयजीपी सुंदरराज यांनी चकमकीची पुष्टी केली आहे.
ही चकमक बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात झाली. इतर नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम अजूनही सुरू आहे. बिजापूर डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर सैनिकांनी नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले आहे. नक्षलवादी मोठ्या संख्येने जमल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी सैन्य पाठवण्यात आले. सकाळपासून अधूनमधून गोळीबार सुरू होता. या कारवाईत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते, असे सुंदरराज यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनीही सैनिकांच्या हौतात्म्याबद्दल दु:ख व्यक्त केले. सुरुवातीला त्यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर बिजापूर जिह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत 12 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती दिली. तसेच या चकमकीत दोन सैनिक हुतात्मा आणि दोन जखमी झाल्याची दु:खद बातमी देखील मिळाल्याचे स्पष्ट केले. मात्र, दिवसअखेरपर्यंत खात्मा झालेल्या नक्षलींचा आकडा 30 च्या वर पोहोचला होता.
2026 पर्यंत छत्तीसगड ‘नक्षलवादमुक्त’ : मुख्यमंत्री
सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली, आपले राज्य मार्च 2026 पर्यंत नक्षलवादापासून मुक्त होईल. या दिशेने सुरक्षा दलांना सातत्याने यश मिळत असून आम्ही लक्ष्याकडे वेगाने वाटचाल करत आहोत. देश आणि राज्यात कर्करोगासारखा पसरलेल्या नक्षलवादाचा अंत निश्चित आहे. हुतात्मा सैनिकांच्या आत्म्यास शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबांना शक्ती मिळो. तसेच जखमी सैनिकांच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त : उपमुख्यमंत्री
छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनीही सदर चकमकीबाबत अधिकृत माहिती दिली. रविवारी झालेल्या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रs आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘बिजापूर जिह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी मारले गेले आहेत. 2 सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दोन जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे स्पष्ट केले.
कारवाईचे सत्र सुरूच
बिजापूरमध्ये झालेल्या चकमकीपूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये विजापूर जिह्यातील गंगलूर पोलीस स्टेशन परिसरातील तोडका जंगलात सकाळी 8.30 वाजता पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सैनिकांनी आठ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले होते. घटनास्थळावरून इन्सास रायफल, बीजीएल, 12 बोर बंदूक जप्त करण्यात आली. या चकमकीत दोन डीआरजी सैनिक किरकोळ जखमी झाले. त्यापूर्वी 21 जानेवारी 2025 रोजी गरियाबंद जिह्यात 14 नक्षलवादी मारले गेले होते. तसेच ऑक्टोबर 2024 मध्ये दंतेवाडा आणि नारायणपूर जिह्यांच्या सीमेवरील थुलथुली गावात 35 नक्षलवादी मारले गेले होते. 2024 मधील देशातील ही सर्वात मोठी नक्षलवादी चकमक ठरली होती. त्यापूर्वी एप्रिल 2024 मधील एका चकमकीत 33 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
चालू वर्षातही कारवाईचा धडाका
यावर्षी 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकीत 50 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून सुरक्षा दलांनी आतापर्यंत विविध चकमकींमध्ये 219 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर विष्णूदेव साई मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून, राज्यात नक्षलविरोधी मोहिमेला वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत राज्य नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे.