पणजीत उभारणार 31 चार्जिंग स्टेशन्स
15 फेब्रुवारीपर्यंत कार्यन्वित होण्याची शक्यता
पणजी : राज्यात ईलेक्ट्रिकल वाहनांना मिळणारी लोकांची पसंती आणि त्यांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ, यांचा विचार करता तेवढ्याच संख्येने चार्जिंग स्टेशन्सचीही गरज भासू लागली असून त्या दिशेने आता सरकारने गंभीरतेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून लवकरच पणजीत तब्बल 31 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत ती कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी कंपनीनेने याकामी पुढाकार घेतला असून राजधानीच्या विविध भागात ही चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यात खास करून दुचाकींसाठी 21 आणि चारचाकींसाठी 10 स्टेशन्सचा समावेश असेल. सावकाश आणि गतीमान अशा दोन्ही पद्धतीने सेवा देणारे हे स्टेशन्स असणार आहे.
रिलायन्स बीपी मोबिलिटी यांच्याकडून शहरातील प्रमुख स्थानांवर ही स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. सांत ईनेज मधुबन सर्कल, काकुलो मॉल आणि कार्पेन्टर्स चॉईस या भागात चार्जिंग स्टेशन्सची प्राथमिक पायाभूत सुविधा पूर्ण केली आहे. आता त्यात आणखी 31 महत्त्वाच्या ठिकाणी चार्जिंग गन्स कार्यान्वित होणार आहेत. त्यात मिरामार, मांडवी हॉटेल, पासपोर्ट कार्यालय, बाल भवन काम्पाल, विशाल मेगामार्ट, नेपच्यून हॉटेल, आल्फ्रान प्लाझा आणि मध्यवर्ती वाचनालय पाटो या भागांचा समावेश आहे. राजधानीत अशाप्रकारे चार्जिंग स्टेशन्ससाठी धोरणात्मक स्थान शोधून आम्ही स्थानिक आणि पर्यटक यांच्यासाठी समान सुविधा निर्माण करत आहोत. हा उपक्रम केवळ ईव्ही लाच प्रोत्साहन देत नाही तर पणजीला एक अग्रेसर तथा पर्यावरणपूरक पर्यटन स्थळ, आर्थिक वृद्धी आणि टिकावू स्थान म्हणून स्थान देतो, असे मत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केले.