शेख हसीनांविरोधात आतापर्यंत 31 गुन्हे
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात आणखी नऊ गुन्हे दाखल करण्यात आले. देशात नवे सरकार आल्यापासून त्यांच्यावर आतापर्यंत 31 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 26 खून, 4 हत्याकांड आणि एका अपहरणाचा समावेश आहे. बांगलादेशातील हेफाजत-ए-इस्लाम या संघटनेचे सचिव मुफ्ती हाऊण इझहर चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात हसीनांविरोधात तक्रार दाखल केल्याचे वृत्त बंगाली डेली स्टारने दिले आहे. हसीना यांच्यासोबतच त्यांचा मुलगा सजीब वाजिद जॉय, मुलगी सायमा वाजिद पुतुल आणि बहीण शेख रेहाना यांनाही आरोपी करण्यात आले आहे. हेफाजत-ए-इस्लामचे कार्यकर्ते 5 मे 2013 रोजी ढाका येथे ईशनिंदेविरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करत असताना पोलिसांनी जमावावर बळाचा वापर केल्याने हिंसक झाले. यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 11 वर्षांनंतर हसीनावर नरसंहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.