हसीना यांच्या विरोधात 100 गुन्हे
वृत्तसंस्था/ढाका
बांगला देशच्या परागंदा नेत्या शेख हसीना यांच्या विरोधात त्या देशात 100 हून अधिक गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यांच्यात हत्येच्या कथित प्रकरणांचाही समावेश आहे. हत्येप्रमाणेच मानवता विरोधी गुन्हेही त्यांच्या विरोधात नोंद करण्यात आले आहेत. हसीना यांचे सध्या भारतात वास्तव्य आहे. मात्र, येथे त्या किती काळ राहू शकतात यासंबंधीही शंका आहे. त्यांच्या व्हिसाचा कालावधी आणखी 20 दिवसांनी संपणार आहे. त्यानंतर भारत सरकारने त्यांना आश्रय दिला नाही, तर त्यांच्यावर भारत सोडण्याची वेळ येऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे. भारताने त्यांना आमच्याकडे द्यावे, अशी मागणी बांगला देशच्या अंतरिम सरकारने केली आहे. शेख हसीना यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर खटले चालविण्याची आवश्यकता आहे. त्यांनी त्वरित बांगला देशात परतावे. भारताने त्यांना आश्रय देऊ नये, असे बांगला देश सरकारचे म्हणणे आहे.
13 ऑगस्टला पलायन
13 ऑगस्टला शेख हसीना यांनी ढाक्यातून पलायन केले होते. तेथे त्यांच्याविरोधात बंड झाले होते. तेथील लष्कारने त्यांचे संरक्षण करण्यास नकार दिला होता. संतप्त जमाव त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी येत होता. आता आपले संरक्षण होऊ शकत नाही, हे समजल्यावर त्यांनी हेलिकॉप्टरमधून बांगला देश सोडला आणि भारतात प्रवेश केला. भारताने त्यांना काहीकाळापुरता आसरा दिला आहे. मात्र, भारताने त्यांना आमच्या आधीन केले नाही, तर भारताशी संबंध बिघडू शकतात, असा इशारा बांगला देशने दिल्यानंतरही भारताने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. उलट बांगला देशनेच तेथील हिंदूंचे संरक्षण करावे, अशी सूचना भारताने केली आहे.