31 रेल्वे गाडय़ांतून फक्त दीड हजार प्रवासी दाखल
गतवर्षी फक्त एकाच गाडीतून दाखल झाले होते हजार प्रवासी
कणकवली
मुंबईकर गणेशभक्त, चाकरमान्यांसाठी प्रतिवर्षी सोडण्यात येत असलेल्या विशेष रेल्वेगाडय़ा यावर्षीही सोडण्याच्या निर्णयास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा विलंब झाला. परिणामी गेल्या वर्षीपर्यंत एका गाडीतून हजारभर संख्येने दाखल होणाऱया प्रवाशांच्या संख्येला यावेळी मोठा ब्रेक लागला. 16 ते 23 ऑगस्ट या काळात दाखल 31 गाडय़ांमधून फक्त दिड हजार प्रवासीच जिल्हय़ात दाखल झाले आहेत.
एकीकडे कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने रेल्वे प्रशासनालाही प्रतिवर्षाप्रमाणे गणेश भक्तांसाठी जादा रेल्वेगाडय़ा सोडण्याचा निर्णय बरेच दिवस घेता आला नव्हता. अखेरीस 14 ऑगस्टला गाडय़ा सोडण्याची घोषणा झाली. त्यानुसार 15 ऑगस्टपासून गणेश भक्तांसाठी जादा गाडय़ा सुरू झाल्या व 16 ऑगस्टपासून त्या जिल्हय़ात दाखल व्हायला लागल्या. तोपर्यंत चाकरमान्यांनी विविध खासगी वाहनांचा आधार घेत, गाव गाठायला सुरुवात केली होती. बहुतांश चाकरमानी हे रेल्वेचा विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय होण्याआधीच गावागावात दाखल झाले होते. परिणामी, या गणेशोत्सव स्पेशल गाडय़ा जवळपास रिकाम्याच धावू लागल्या.
अवघे दिड हजार चाकरमानी दाखल
16 रोजी तीन फेऱयांमधून 115, 17 रोजी 3 फेऱयांमधून 61, 18 रोजी 4 फेऱयांमधून 144, 19 रोजी 5 फेऱयांमधून 273, 20 रोजी 4 फेऱयांमधून 266, 21 रोजी चार फेऱयांमधून 161, 22 रोजी चार फेऱयांमधून 278, 23 रोजी 4 फेऱयांमधून 194 प्रवासी येथे दाखल झाले आहेत.
परतीच्या गाडय़ांचा प्रतिसाद वाढतोय!
मात्र, मुंबईच्या दिशेने जाणाऱया गाडय़ांमधील प्रवासी वाढत आहेत. कोरोनाचा मुंबईसारख्या शहरांमध्ये धोका वाढू लागला, तसे कित्येक चाकरमान्यांनी गाव गाठायला सुरुवात केली होती. राज्य सरकारतर्फेही त्यासाठी ई-पास वगैरे नियम ठेवले होते. परिणामी, गावी जाण्यासाठी गणेश चतुर्थीची वाट बघणारे चाकरमानी यावेळी मात्र अगदी एप्रिल, मे महिन्यापासूनच गावी आहेत. आता मुंबईतील बहुतांश व्यवहार सुरळीत झाल्याने त्यांना मुंबई गाठायची आहे. परिणामी हे चाकरमानी आता गणेशोत्सवासाठी सोडलेल्या, परतीच्या दिशेने असलेल्या रेल्वेगाडय़ांमधून मुंबई गाठत आहेत.