निलेश राणे 50 हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील
खासदार नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास
कुडाळ -
भविष्यात विकास तसेच नागरी सुविधा हव्या असतील तर महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्यासारखा आमदार हवा. निलेश राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुडाळ- मालवण मतदारसंघात लोक समाधान व्यक्त करीत आहेत.निलेश राणे 50 हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील. तसेच या जिह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील व त्यांना निवडून आणणारच,असा ठाम विश्वास माजी केंद्रीय माजी व भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मी निष्ठावंत आहे, असे सांगणारे येथील आमदार शिवसेना प्रवेशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वारंवार जात होते.आपण त्यांना पक्षात घेऊ नका असे सांगितले. येथील आमदार निष्क्रिय असल्याची टीका श्री राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व आमदार वैभव नाईक यांच्यावर केली. महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक येथील हॉटेल लाईम लाईट येथे श्री राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.महायुतीचे उमेदवार माजी खासदार नीलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना ( शिंदे गट ) उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई ,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर , आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अजित कदम , राजू राऊळ, आर. के. सावंत, संजय भोगटे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.राणे म्हणाले, महायुतीचे उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यानंतर या मतदारसंघातून नीलेश राणे यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. भविष्यात विकासासाठी, नागरी सुविधांसाठी व रोजगार निर्मितीसाठी नीलेश राणे यांच्यासारखा आमदार आम्हाला हवा आणि तो मिळतोय. म्हणून लोक समाधान व्यक्त करीत आहेत. येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.त्यात कमीत कमी 50 हजारांच्या मताधिक्याने नीलेश राणे निवडून येतील, याची खात्री आमच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे आमचा कुडाळ - मालवण आणि जिल्ह्यातील विधानसभेच्या दुसऱ्या दोन्ही जागावर मिळून तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील यावर आपला पूर्ण विश्वास आहे. आणि निवडून आणणारच, असे त्यांनी सांगितले.
आमच्या प्रचाराचा विषय हा गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील जनतेसाठी ज्या योजना आणल्या. पन्नास योजना आहेत.त्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवित आहोत. या योजनेमुळे देशाची प्रगती झाली. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आला. एक - दोन वर्षानंतर आपला देश तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न मोदी आणि आमच्या सरकारचा आहे. तसेच आमच्या महाराष्ट्र सरकारने पण गेल्या अडीज वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार महाराष्ट्र अतिशय गतिमान विकसित व्हावा.यासाठी प्रयत्नशील असल्याचे राणे यांनी सांगितले.